लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मुलगा, पत्नी व घरातील सर्व मंडळी झोपल्यानंतर मध्यरात्री दीड वाजता घर सोडले. त्यानंतर पावणेतीन वाजता मुलासह चार जणांना फोन करून मी जग सोडतोय, असे कळविले आणि काही क्षणातच कैलास धनसिंग पाटील (वय ५५) यांनी निबांच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बोरखेडा, ता. धरणगाव येथे घडली. शेतात राब राब राबून खर्चही निघत नाही. त्यात कर्ज व व्याजाचा डोंगर वाढतच चालल्याने नैराश्यात येऊन पाटील यांनी आत्महत्या केली आहे.
जिल्हा रुग्णालयात आलेल्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास पाटील यांच्याकडे १५ बिघे शेतजमीन आहे. शेतात संपूर्ण कुटुंब राबते. पण नफा तर सोडाच पेरणी, बियाणे, खते व मजुरी याचाही खर्च निघत नाही. शेतीसाठी दरवर्षी बँक, विकास सेवा सोसायटी तसेच खासगी लोकांकडून कर्ज घ्यावे लागते. या कर्जाचे व्याजाचे मीटर सुरूच असतात. उत्पन्नात घट, कर्ज फेडणे नाकीनाऊ आले. कुटुंबाचा गाडा चालविणेही अवघड झाल्याने पाटील यांनी थेट आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी संजूबाई, मुलगा सोपान, गजानन, आई सीताबाई, वडील धनसिंग पौलाद पाटील व भाऊ असा परिवार आहे. मंगळवारी सकाळी विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
बॅटरी चमकताच घेतला गळफास
कैलास पाटील यांनी मंगळवारी पहाटे तीन वाजता गळफास घेतला. तत्पूर्वी त्यांनी सर्व जण झोपलेले असताना घर सोडले. दोरी घेऊन त्याचा फास तयार केला व निंबाच्या झाडावर बसून राहिले. तेथून त्यांनी मुलगा, नातेवाईक व मित्र अशा चार जणांना फोन करून मी जगाचा निरोप घेत असल्याचे सांगितले. घाबरलेल्या या चौघांनी तातडीने शेताकडे धाव घेतली. रात्रीच्या अंधारात बॅटरी चमकल्याचे दिसताच त्यांनी गळफास घेतला, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.