लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘कोणी काहीही शितोंडे उडवले, तरी मी कोणासाठीही काम करीत नाही. महाराष्ट्र आणि माझ्या पक्षासाठी काम करतो. पक्षाच्या बळकटीकरणासाठी विभागनिहाय दौरे सुरू आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूकही स्वबळावर लढविणार आहे,’ अशी घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवरायांच्या वक्तव्याबद्दल राज ठाकरे यांनी काही लोकांना पद मिळाले, पण पोच आली नाही, अशी खाेचक टिप्पणी केली. राज्यात मंत्री असलेला एक जण महिला नेत्यांबद्दल अपशब्द वापरतो, सांगलीतील भंपक आमदार असेच काहीतरी बरळतो. इतकी सध्याच्या राजकारणाची पातळी घसरली आहे. अशा लोकांना प्रसिद्धी देणे बंद केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
सीमाप्रश्न आताच का ?महाराष्ट्राचे मूळ प्रश्न चव्हाट्यावर येऊ नयेत, त्याबद्दल सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारू नये म्हणून सीमाप्रश्नाचा विषय उकरून काढला जात आहे. राज्यपाल यासाठीच वक्तव्य करतात का? याचाही शोध घेण्याची गरज आहे, असेही ठाकरे म्हणाले.