बोदवड, जि. जळगाव : पक्षात अनेक नवीन लोक येत आहेत. त्यांना संधी दिल्याने पक्षाचे भविष्यकालिन महत्त्व वाढत आहे. मात्र आपली यापुढे कोणतेही पद घेण्याची इच्छा नसल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बोदवड येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले.बोदवड नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी शुक्रवारी निवडणूक झाली. भाजपने या ठिकाणी सत्ता कायम ठेवल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खडसे बोदवड येथे आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते नवनियुक्त नगराध्यक्षा मुमताजबी बागवान व उपनगराध्यक्ष दिनेश माळी यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर गाठून यावेळी मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला का डावलले याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, पक्षात नवीन मंडळी येत आहे. त्यामुळे पक्ष वाढत आहे. त्यांना संधी दिल्याने पक्षाचे भविष्य वाढत आहे. सध्या पक्षाने दिलेली जबाबदारी सांभाळत आहे. मात्र आता पद घेण्याची इच्छा नसल्याचे सांगत याबाबत नाराजी नसल्याचे सांगितले. यापुढे ही पक्षाचे काम करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी कार्यकर्त्यांसोबतही संवाद साधला. यावेळी रामदास पाटील, कैलास चौधरी, अनिल खंडेलवाल, मधुकर राणे, सईद बागवान दिलीप घुले उपस्थित होते.
आता पद घेण्याची इच्छा नाही- एकनाथराव खडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:49 PM