लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ठेकेदार अजय चंदनकर यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांचा मुलगा राहुल आणि पत्नी विद्या चंदनकर यांनी जिल्हा रुग्णालयात मन हेलावणारा आक्रोश केला. विद्या चंदनकर यांना प्रचंड मानसिक धक्का बसल्याने त्यांना बोलताही येत नव्हते. वडील जिवंत आहेत या समजातून मुलाने आपत्कालीन विभागातून वडिलांचा मृतदेह थेट बाहेर आणला, यावेळी सुरक्षारक्षकांनी गेट बंद केल्याने ‘गेट उघडा, पप्पांना नेऊ द्या,’ अशा विनविण्या हा मुलगा करीत होता. त्याची अवस्था पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आले होते.
चंदनकर यांना रुग्णालयात आणल्यानंतर तातडीने डॉक्टरांनी तपासण्या केल्या. यात ईसीजी केल्यानंतर डॉक्टरांनी आधीच त्यांना मृत घोषित केले होते. नातेवाइकांना याची कल्पना दिली होती. यावेळी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. नितीन विसपुते यांच्याकडे जबाबदारी होती.
वडिलांना नेऊ द्या... मुलाच्या विणवण्या
मृतदेह आपत्कालीन विभागात असताना राहुल, त्याची आई, सोबत नातेवाईक हे आपत्कालीन विभागात आले. मृत्यू झाल्याचे कळताच त्यांना प्रचंड धक्का बसला व त्यांनी मोठा आक्रोश केला. त्यांना बाहेर नेल्यानंतर राहुल हा पुन्हा आपत्कालीन विभागात गेला आणि वडिलांना खासगी रुग्णालयात घेऊन जातो असे म्हणत तो थेट मृत वडिलांना स्ट्रेचरवर घेऊन बाहेर आला. सुरक्षारक्षकांनी यावेळी दरवाजा बंद केला होता. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, अखेर मोठ्या गोंधळानंतर गेट उघडण्यात आले, मात्र, मुख्य गेट बंदच ठेवत सर्व सुरक्षारक्षकांनी राहुलला मृतदेह देण्यास नकार दिला. तेव्हा मात्र, तो वडिलांना घेऊन जाऊ द्या, अशा विनवण्या करीत होता.
शवविच्छेदन गृहाबाहेर सर्व सुन्न
डॉक्टरांना तो वारंवार विचारणा करीत होता. अखेर नातेवाइकांनी त्याला समजावून बाजूला नेले व मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जात असतानाही नातेवाइकांनी तो घेऊन जाऊ नये, अशा विनविण्या केल्या. अर्धा तास हा आक्रोश सुरू होता. यावेळी जिल्हा रुग्णालयात प्रचंड गर्दी उसळली होती. अखेर मृतदेह विच्छेदनासाठी नेल्यानंतर तेव्हापासून बराच वेळ विद्या चंदनकर यांना बोलताही येत नव्हते, त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसल्याने त्यांची शुद्ध हरपली होती.