नवल अहंकाराची गोठी । विशेंषें न लगे अज्ञानापाठी ।सज्ञानाचे झोंबे कंठी । नाना संकटी नाचवी ।।या ओवीचा सरळ सरळ अर्थ असा आहे की, अहंकाराची गोष्ट काही विलक्षणच आहे. अहंकार हा अज्ञानी पुरुषाच्या मागे विशेष करून लागत नाही; परंतु ज्ञानवान पुरुषाचे नरडे धरतो आणि त्याला नाना प्रकारच्या संकटांत गोते खावयास लावतो.संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायात (प्रकृतिपुरुष विवेक योग) मनुष्याच्या देहाचा व तो देह ज्याच्या सत्तेने चालतो त्या पुरुषाचा विचार केला आहे. हे शरीर ३६ तत्त्वांचे मिळून झालेले आहे. पंचमहाभुते, अहंकार, बुद्धी, अव्यक्त, पंच ज्ञानेंद्रिये, पंच विषय, पंच कमेंद्रिये, पंच कर्म, मन, इच्छा, सुखदु:ख, द्वेष, चेतना, धृति या पस्तीस तत्त्वांच्या समुदायाला संघात म्हणतात. आणि ही ३६ तत्त्वे मिळून शरीर तयार होते. माणसातील अहंकार देखील त्याचा शरीराचा अविभाज्य घटक आहे, म्हणून प्रत्येक माणसात अहंकार आहे. लहान बालकांमध्ये तारुण्य जसे गुप्त असते किंवा लाकडामध्ये अग्नि जसा गुप्त असतो त्याप्रमाणे माणसांत अहंकार गुप्त असतो.मोठ्या लोकांनाच जास्त अहंकार असतो, कुणाला रुपाचा, कुणाला धनाचा, कुणाला सत्तेचा तर कुणाला शिक्षणाचा वगैरे आणि या अहंकारामुळेच आपत्तीही ओढावते. शास्त्रात किंवा गीतेत अहंकार हा उपजतच आपल्या शरीरात असतो हे सांगितले आहे. ज्याप्रमाणे शरीरात तापमान असतेच; परंतु मर्यादेपेक्षा जास्त झाले तर भिती असते अगदी त्याचप्रमाणे अहंकार देखील मर्यादेपेक्षा जास्त झाला तरच भिती असते. म्हणून माणूस अहंकार शून्य होऊ शकत नाही; परंतु अहंकार हा नियंत्रित असावा आणि हीच मागणी संत परमेश्वराजवळ करतात.अहंकाराचा वारा न लागो राजसा । माझिया विष्णूदासा भाविकांसीवारकरी परंपरेत कीर्तन संपल्यावर हा अंभग म्हटला जातो. अहंकाराचा वारादेखील माझ्या विष्णूदासांवर पडू देऊ नकोस, असे संत नामदेव महाराज म्हणतात. अहंकाराची मात्रा नियंत्रित ठेवण्यासाठी संत तुकोबांनी एका अभंगात सांगितले आहे. जाणोनि नेणते करी माझे मन । तुझी प्रेमखुण देऊनिया ।।अरे देवा ! माझ्या मनात जाणीव व नेणीव ही कल्पना येऊ देऊ नको फक्त तुझी प्रेमखुण दे ।संत ज्ञानेश्वरांनी देखील या ‘अहं’ नियंत्रित ठेवण्यासाठी उपाय सांगितला आहे. मी तू पण जाऊ दे दुरी । एकचि घोंगडी पांघरुं हरी ।।ज्यावेळी शरण्यागती असते त्याचवेळेस हा अहंकार नियंत्रित असतो. अन्यथा हा डोके वर काढतो. माऊली म्हणतात या ‘‘मी’’ आाणि ‘‘तू’’ पणामुळेच सर्व बिघडते. ‘‘मी’’ आणि ‘‘तू’’ जाऊं देतं व आपण होवू या ! ‘आपण करू’ या शब्दात अहंकार हा नियंत्रित दिसतो.आपल्यातील अहंकार नियंत्रित करावयाचा असल्यास माऊलींची ज्ञानेश्वरी व भगवान श्रीकृष्णाची गीता अध्ययन करावे. जगात कोठे नाही एवढं तत्वज्ञान संत ज्ञानोबा माऊलींना ज्ञानेश्वरीच्या रुपाने जगासमोर ठेवले. परंतु तरी देखील स्वत: बद्दल ज्ञानोबा माऊली काय म्हणतात.ऐºहवी तरी मी मुर्खु । जरी जाहला अविवेकु ।।संत एकनाथांनी म्हटले आहे, कैवल्याचा पुतळा । प्रगटला भुतळा । चैतन्याचा जिव्हाळा । ज्ञानोबा माझा ।। १ ।।कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, साधकांचा मायबाप, ज्ञानियांचा शिरोमणी, चिंतकाचा चिंतामणी असे असणारे ज्ञानोबा स्वत:ला अविवेकी म्हणतात. आता आपण कुठे बसतो याचा विचार करु या म्हणजे आपला अहंकार राहणार नाही.- डॉ.कैलास पाटील
मी तू पण जाऊ दे दूरी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 8:03 PM