जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील मेहुण या गावी दशरथ जीवराम चौधरी व गोदावरीबाई दशरथ चौधरी या दाम्पत्याच्या पोटी गोपाल चौधरी म्हणजे माझा २६ डिसेंबर १९५१ रोजी जन्म झाला. बालपणापासूनच माझ्यावर आध्यात्मिक संस्कारांचा पगडा आहे. पहिली ते सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण तत्कालिन तापी नदीकिनारी असलेल्या जि.प. शाळेत झाले. त्यानंतर आठवी ते अकरावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण चांगदेव येथील शाळेत झाले. बारावी ते बीएपर्यंतचे शिक्षण मध्य प्रदेशातील बºहाणपूर येथे घेतले. महाविद्यालयात असताना प्रा.वि.रा. गर्गे यांनी मराठी साहित्याविषयी मला मार्गदर्शन केले. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात १९९३ मध्ये एलएलबी करून वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव व औरंगाबाद येथील न्यायालयात वकिली केली. हे करत असताना १९९३ ते १९९८ दरम्यान दरवर्षी अॅटो ग्लान्स अॅडव्होकेट डायरीचे प्रकाशन केले. १९६८-६९ मध्ये तापी नदीकिनारी असलेल्या श्रीसंत मुक्ताई यांच्या गुप्तस्थळ मंदिरात राहणाऱ्या श्रीराम महाराजांशी माझा संपर्क आला. महाराज मंदिरात नेहमी ज्ञानेश्वरी, श्रीमद् भागवत कथा, संत तुकाराम गाथा, अमृतानुभव, एकनाथी भागवत यांचा सखोल अर्थ समजावून सांगत असत. घरातील आध्यात्मिक वातावरण आणि त्याला संत मुक्ताई मंदिरात होत असलेल्या धार्मिक कार्यक्रमांची जोड मिळाल्याने माझा पिंड धार्मिकतेकडे वळू लागला. त्याचप्रमाणे मंदिरात राहणारे काशीनाथभाऊ यांनी मला श्रीमद् भगवद्गगीतेची संथा दिली. वयाच्या एकविसाव्या वर्षी १९७२ मध्ये संत मुक्ताई यांच्या अभंग व ओव्यांचे संकलन करून मी मुक्ताबाईंची कविता या पुस्तकाचे लेखन करून हे पुस्तक प्रकाशित केले. त्यानंतर १९७३ मध्ये चित्रमय श्रीक्षेत्र मेहुण ही फक्त फोटो असलेली पुस्तिका प्रकाशित करून संत मुक्ताईंचा प्रचार व प्रसार करण्याचे काम सुरू केले. त्याच वर्षी मुक्ता-मेहुण महात्म्य पुस्तिकेचे लेखन करून प्रकाशनही केले. त्याच पुस्तकात संत आदिशक्ती मुक्ताई यांची आरती प्रकाशित केली. याआधी मुक्ताईंची आरती नव्हती. इतर देवीदेवता आणि संतांची आरती मुक्ताईंच्या मंदिरात म्हटली जात असे. तेव्हा श्रीराम महाराज आणि काशीनाथभाऊ महाराज यांनी मुक्ताई आरती लेखन करण्याचे काम बाबूराव महाराज, टी.के. पाटील व माझ्यावर सोपविले. आम्ही तिघांनीही मुक्ताईंची आरती लिहिली. त्यापैकी मी लिहिलेली आरती मंदिरात रोज म्हटली जाऊ लागली. हिच आरती आज संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर अखिल वारकरी संप्रदायात मोठ्या श्रद्धेने म्हटली जात आहे. या आरतीचा रचियता म्हणून मला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यानंतर १९७८ ते १९८० दरम्यान एक साप्ताहिक काढून त्याचे यशस्वी संपादन केले. २००३ मध्ये माझ्या डोळ्यांनी माझी साथ सोडली. जवळ जवळ ९० टक्के मी आंधळा झालो. एवढे होऊनही मी माझ्यातल्या साहित्यिकाच्या पिंडाला कधी दूर लोटले नाही. आतापर्यंत असा ग्रंथ कोणी लिहिला नसल्याने हा ग्रंथ ऐतिहासिक झाला आहे व भाविकांकडून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आजतागायत वयाची ६८ वर्षे पूर्ण झाली आहेत. अनेक ग्रंथांचे लेखन पूर्ण झाले असून ते सध्या अप्रकाशित आहेत. असे सोमेश्वर पुरातन : मेहुण महात्म्य ओवीबद्ध एकूण नऊ अध्याय, निंबाई पुराण ओवीबद्ध एकूण नऊ अध्याय, संत मुक्ताईंच्या ताटीच्या अभंगांचे सार्थ विवरण, मराठी कवितासंग्रह मनोरथांचे मनोरे गीत आध्यात्म प्रमुख, हिंदी कवितासंग्रह गदीर्शे दौर प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणे, संस्कृत भक्तीवेध एका भागात १९८ श्लोक असे पाच खंड अशी पुस्तके लिहून तयार आहेत. यापुढेही जगलो तर ही लेखन सेवा मरेपर्यंत सुरूच राहील. मुक्ताईनगर तालुक्यातील मेहुण-चिंचोल या गावात मी राहत असून प्रसिद्धीपासून दूर असल्याने अनेकांना माझ्या साहित्याची कल्पनादेखील नसेल. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे मर्यादा आल्या आहेत. मुक्ताईंचे नामस्मरण हाच एक ध्यास शेवटच्या श्वासापर्यंत माझा राहील. यामुळे माझे जीवन कृतार्थ झाले आहे, असे मी समजतो.(शब्दांकन -डॉ.जगदीश पाटील)
कृतार्थ मी... यथार्थ मी... सेवार्थ मी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 11:30 PM