सरकारी योजनेतून कर्ज प्रकरण मंजूर करण्यासह शासकीय अनुदान मिळवून देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रात कनिष्ठ कर्मचाऱ्यांपासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत लाचखोरांची साखळीच असून, त्यांच्यातील संभाषणावरून हितसंबंध उघड झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या कार्यालयातील इतरांची चौकशी व पुरावे गोळा करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या आनंद देवीदास विद्यागर (वय ५०, रा. अजय कॉलनी, रिंगरोड मूळ, रा.औरंगाबाद) या प्रकल्प अधिकाऱ्याला दोन दिवस पोलीस कोठडी मिळण्याची विनंती न्यायालयाकडे केली. त्यानुसार न्यायालयाने विद्यासागर याला दोन दिवस कोठडी सुनावली.
भुसावळ येथील ३५ वर्षीय तक्रारदार तरुण सुशिक्षित बेरोजगार असून, त्यांनी पीएमईजीपी या शासनाच्या योजनेंतर्गत कर्ज व सबसिडी योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचा प्रकल्प अधिकारी विद्यासागर याच्याकडे प्रकरण सादर केले होते. हे प्रकरण अपलोड करून बँकेस पाठविण्याच्या मोबदल्यात विद्यासागर याने तक्रारदार याला मी दुसऱ्या लोकांकडून १५ ते २० हजार रुपये घेतो, असे सांगून दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. दरम्यान, अटकेनंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने संशयिताची घरझडती घेतली, मात्र त्यात काहीच आढळून आले नाही. मात्र आरोपी व फिर्यादी यांच्यातील संभाषणावरून याची साखळी कनिष्ठ ते वरिष्ठ असल्याचे निष्पन्न झाले आहे. बुधवारी विद्यागर याला न्यायालयात हजर करण्यात आले. सहायक सरकारी वकील भारती खडसे यांनी युक्तिवाद केला. बँक खाते, लॉकर, पतपेढी ठेवी, शेअर्स व जंगम मालमत्तेची चौकशी करण्यासाठी त्याला दोन दिवस कोठडी सुनावण्यात आली.
ताई काम झाले, म्हणताच विद्यागर जाळ्यात
सुशिक्षित बेराेजगार तरुणाने लाचेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सतीश भामरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, हवालदार अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्धन चौधरी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ व महेश सोमवंशी यांनी मंगळवारी जिल्हा उद्योग केंद्राच्या बाहेर सापळा रचला. यावेळी लाचेची रक्कम स्वीकारताच तक्रारदाराने ‘ताई माझे काम झाले, मी येथून निघतो’, असा फोन करण्याचे ठरले होते. त्यानुसार तक्रारदाराने फोन केला अन् काही सेकंदातच विद्यागर जाळ्यात अडकला.