नवी दिल्ली - राजकारणात जी भूमिका घेईल ती छातीठोकपणेच घेईल. लवकरच आपले नेते अमित शहा यांना भेटणार असून, त्यांच्याशी मुक्तपणे चर्चा करणार असल्याचे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले. पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावर भाषण करताना पुन्हा एकदा पक्षातील आपली नाराजी दर्शवली. त्यामुळे, पंकजा मुंडेंच्या नाराजीवरुन सातत्याने राजकीय वर्तुळात चर्चा होतात. यासंदर्भात आता माजी भाजप नेते आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनीही मत मांडले आहे. तसेच, आपण पुन्हा भाजपात जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विनोद तावडे यांनी एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजपात यावे, असे आवाहन केले होते.
पंकजा मुंडे अस्वस्थ आहेत ही गोष्ट खरी आहे, पंकजाताईंचा पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना सन्मानाचे स्थान कुठेही देण्यात आले नाही. अनेकांना निवडणुकीत उभा न करता विधान परिषदेचे सदस्यत्व दिले गेले, काहींची वेगवेगळ्या पदावर नियुक्तीही करण्यात आली. मात्र, पंकजा मुंडेंचा विचार कुठेही केला नाही, सातत्याने पंकजा मुंडेंवर अन्याय झाल्याची भावना त्यांच्या मनात आहे, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडेंना भाजपने डावलल्याचा आरोप केला आहे.
एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडेंच्या नाराजीवर भाष्य केले. तसेच, भारतीय जनता पार्टीने सहा साखर कारखान्यांना मदत केली, परंतु पंकजा यांच्या साखर कारखान्याला मदत केली नाही. एकप्रकारे हा त्यांच्यावरती होत असलेला अन्याय वाटतो. यावरून कुठे ना कुठे पंकजा मुंडे यांना डावलण्याचा प्रकार होत असल्याचे एकंदरीत चित्र आहे, असेही खडसेंनी म्हटले.
मी भाजपात जाणार नाही
विनोद तावडे आणि मी अनेक वर्षे भारतीय जनता पार्टीचे काम करत होतो. भारतीय जनता पार्टीच्या विस्तारामध्ये विनोद यांचं फार मोठे योगदान राहिलेलं आहे, अलीकडची परिस्थिती पाहिली तर त्यांना असे वाटते की जुन्या लोकांनी एकत्र यावे, त्यामुळे निवडणुका जिंकण्यास मदत होऊ शकेल, कर्नाटकच्या निकालाचे चित्र एकंदरीत पाहून जुन्या नेत्यांना एकत्रित आणण्याचे विवेचन विनोद यांनी केले असावे, असे म्हणत एकनाथ खडसेंनी विनोद तावडे आणि त्यांच्या मैत्रीचा उल्लेख केला. तसेच, मी कुठल्याही परिस्थितीत भाजपात जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ऑन रावेर लोकसभा
आगामी लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघाच्या जागेसंदर्भात विचारले असता, अजून निवडणुका लागलेल्या नाहीत, महाविकास आघाडीमध्ये अजून कोणती जागा कुणाचीही ठरलेले नाही. जोपर्यंत या जागेबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होत नाही, तोपर्यंत प्रतिक्रिया देणे योग्य नाही, असे खडसेंनी स्पष्टपणे म्हटले.