लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ब्रेक के बाद ! पुन्हा कोरोना विषाणूने जळगावात थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे मृत्यू दर सुध्दा चोर पावलांनी वाढत असून गेल्या वीस दिवसात शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत तब्बल २२१ मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या मृतांमध्ये सर्वाधिक कोरोना बाधितांचा समावेश असल्याची नोंद स्मशानभूमीत घेण्यात आली आहे. बाधितांचे मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नेरी नाका स्मशानभूमीतील शांत झालेल्या चौकटी पुन्हा धगागू लागल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यासह शहराला कोरोनाने वळखा घातला असून जिल्ह्यात कोरोनामुळे दररोज बळी पडणा-यांची संख्या आता पुन्हा वाढत चालली आहे. या बाधित मृतांवर शहरातील नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाही त्याठिकाणी करण्यात आली आहे. दररोज कोरोना व अन्य आजारामुळे मयत पावलेल्या १७ ते १८ व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जाते. मागील वर्षी कोरोनाने अक्षरश: थैमान घातल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आता पुन्हा कोरोनाने पाय पसरवले आहे. एकीकडे कोरोना बाधित आढळून येणाऱ्यांची संख्या हजारापर्यंत पोहचली असताना, दुसरीकडे बाजारांमधील गर्दी अजूनही कायम आहे. कोरोनामुळे पाच ते सहा व्यक्तींचे दररोज मृत्यू होत आहेत. त्यामुळे आता तरी नागरिकांनी सावध होणे गरजेचे आहे.
१ ते २० मार्च या वीस दिवसांमध्ये नेरीनाका स्मशानभूमीमध्ये एकूण २२१ मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यामध्ये १४६ व्यक्तींना कोरोनाची लागण होती तर इतर आजार होते. मात्र, या मृतांमध्ये सर्वाधिक कोरोना बाधितांचा समावेश आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील कोरोना बाधितांवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाते, अशी माहिती तेथील स्मशानभूमी रक्षकाने दिली. दरम्यान, स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला येणा-यांचीही त्याठिकाणी पुन्हा गर्दी होताना पहायला मिळाले.
दिवसाला किती अंत्यसंस्कार (कोरोना, निमोनिया व अन्य आजार)
२ मार्च - ०४
३ मार्च - ०२
४ मार्च - ०४
५ मार्च - ०४
७ मार्च - ०६
८ मार्च - ०८
९ मार्च - ०९
१० मार्च - ०८
११ मार्च - ०७
१२ मार्च - ०६
१३ मार्च - १२
१४ मार्च - ०७
१५ मार्च - १२
१६ मार्च - ०८
१७ मार्च - १०
१८ मार्च - १५
१९ मार्च - ०८
२० मार्च - १४