९१२८ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार
शेळगाव बंधाऱ्यामुळे ४.५ टीएमसी इतक्या पाण्याचा साठा होणार आहे. यामुळे यावल तालुक्यातील ९१२८ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून हजारो शेतकऱ्यांना यांचा लाभ होणार आहे. या बंधाऱ्याचे काम सुरू असले तरी रॅडल गेटमुळे या प्रकल्पाची किंमत वाढली आहे. १९९७-९८ मध्ये या प्रकल्पाचे मूल्य १९८.०५ कोटी इतके होते. २०१६ साली याला ९६८.९७ कोटी रुपयांची द्वितीय सुधारित मान्यता प्रस्तावित करण्यात आली होती. १३ जानेवारी २०२१रोजी झालेल्या बैठकीत यालाच राज्यशासनाची मान्यता मिळाली असून याचमुळे या प्रकल्पाला वाढीव निधी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
८० टक्के काम पूर्ण
शेळगाव बॅरेजचे सुमारे ८० टक्के काम आजच्या स्थितीत पूर्ण झालेले असल्याची माहिती तापी महामंडळाचे अधीक्षक अभियंता प्रशांत मोरे यांनी ‘लोकमत’ला दिली. एप्रिल २०२१ अखेरपर्यंत धरणाचे कॉंक्रीटचे काम पूर्ण होऊ शकेल. त्यानंतर केवळ गेट बसविणे व इतर किरकोळ कामे तसेच पुलांची कामे आदी कामे बाकी राहतील. मात्र पावसाळा सुरू होईल. त्यामुळे गेट बसविण्याचे काम पुढील वर्षी म्हणजेच फेब्रुवारी २०२२ मध्ये पूर्ण होऊ शकेल. त्यानंतर या प्रकल्पात पाणीसाठा होऊन त्याचा लाभ मिळू शकेल. अर्थात त्यासाठी आवश्यक निधी मात्र वेळेवर मिळण्याची गरज आहे.
वर्षभरात झाले १२ टक्के काम
शेळगाव बॅरेजला निधी उपलब्ध झाल्यानंतर कामाला गती आली. वर्षभर कोरोना काळातही १२ टक्के काम झाले आहे. दोन्ही बाजूंच्या मार्गदर्शक भिंतींचे काम, माती काम, सर्व्हिस बे आदी काम पूर्ण झाले. पिळोदा पुलाचे गर्डरचे काम सुरू झाले असून जळगाव पुलाचे कामही सुरू करण्यात आले आहे.