लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सेवानिवृत्ती ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. मी केवळ पोस्ट सोडणार आहे, काम नाही. १ जुलैपासून पुन्हा यंत्रणेत येऊन समाजाची सेवा करणारच, असा मानस सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी यांनी व्यक्त केला आहे. सेवानिवृत्तीच्या दिवशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. जर मी सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेत असेल तर मी प्रचंड काम केले पाहिजे व ते मी करणार, असेही ते यावेळी म्हणाले. गणेश चौधरी हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी ३१ वर्षे सेवा बजावली.
गणेश चौधरी यांनी गेले ७ महिने जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक या दोन प्रमुख जबाबदाऱ्या सांभाळल्या. आपल्या पूर्ण सेवेचे समाधान असून, शेवटच्या दहामध्ये असलेला जिल्हा पहिल्या दहामध्ये आणला. नवीन संकल्पना राबविल्या. स्वयंरोजगारावर भर दिला. गावांमध्ये शहरी सुविधा पोहचविण्यासाठी काही गावांची निवड करून त्या ठिकाणी एक महत्त्वाकांक्षी योजना राबविली, विविध ठिकाणी विकासात्मक कामे करण्याची संधी मिळाली, त्याचे समाधान असल्याचे चौधरी यांनी सांगितले. राज्यात एक हजार एनजीओंची चळवळ सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.