सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : इडी व पोलीस केसेसच्यावेळी भाजपत गेलो नाही, आता कशाला जाऊ. मला तेथे जाण्याची आवश्यकता नाही. जायचेच असेल तर लपून छपून नाही तर शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच उघडपणे जाईन अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना उत्तर दिले. खासदार रक्षा खडसे राष्ट्रवादीत येणार नाही. दहा वर्ष भाजपच्या खासदार राहिल्या आहेत, त्यामुळे पक्ष सोडण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे, असेही स्पष्टीकरण खडसे यांनी दिले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरद पवार गटाची बैठक मंगळवारी पक्षाच्या कार्यालयात झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत खडसे बोलत होते. भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवर आजही आपले चांगले संबंध आहेत. स्थानिक कोणत्या नेत्याच्या परवानगीची मला गरज नाही, असेही मंत्री गिरीश महाजन व अनिल पाटील चार महिन्याचे आमदार आहेत, मी चार वर्षासाठी आमदार राहणार आहेत. अंधारात अर्थात वाईट काळात शरद पवारांनी मला सहा वर्षासाठी आमदार केले. त्यांना सोडून मी जाऊ शकत नाही. भाजप पक्ष श्रेष्ठींनी रक्षा खडसे यांच्या मार्फत भाजपमध्ये येण्याचा निरोप दिल्याच्या प्रश्नावर रक्षा मला सल्ला देतील अजून त्या इतक्या मोठ्या झालेल्या नाहीत, असे उत्तर त्यांनी दिले. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून आपला सन्मान गमावला आहे. ५० आमदार सोबत सांगतात, आणि लोकसभेसाठी तीनच जागांवर समाधान मानावे लागत आहे, त्यातही एक जागा पत्नीची आहे.