लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील मेहरूण तलावात वाढत जाणाऱ्या जलपर्णीबाबत मनपा प्रशासनाकडून अद्यापही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. मराठी प्रतिष्ठानसह अनेक पर्यावरणप्रेमींकडून जलपर्णी काढण्याची मागणी केली जात आहे. तर उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यास जलपर्णी नष्ट होवून जाईल असे मत मनपा अधिकाऱ्यांचे आहे. मात्र, ही वनस्पती वाढत गेल्यास तलावाचे अस्तित्व धोक्यात येईल अशी भिती पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
कोणत्याही तलावात किंवा नदी पात्रात जलपर्णीचा विस्तार वाढला तर काही वर्षात त्याठिकाणी केवळ जलपर्णीच दिसते, त्यामुळे आज जे तलावाचे सौंदर्य जळगावकरांना अनुभवण्यास मिळत आहे. ते काही वर्षात नष्ट होण्याचीही भिती व्यक्त केली जात आहे. मेहरूण तलावात मोठ्या प्रमाणात जैवविविधता असून, अनेक प्रकारच्या वनस्पती देखील मेहरूण तलावाच्या जलाशयात आहेत. मात्र, जलपर्णीचा वाढत जाणारा विळखा काही प्रमाणात तलावाचे अस्तित्व धोक्यात आणू शकतो.
जलपर्णी बाबत मतभिन्नता
जलपर्णी बाबत पक्षीमित्र व पर्यावरण प्रेमींमध्ये काही प्रमाणात मतभिन्नता आहे. जलपर्णी वाढल्यास स्थलांतरीत पक्षी असो वा स्थानिक पक्षी यांना अन्न चांगल्याप्रकारे उपलब्ध होत असते. पक्ष्यांसाठी काही प्रमाणात असलेली जलपर्णी फायदेकारक आहे. मात्र, ही जलपर्णी वाढत गेल्यास संपूर्ण जलाशयच व्यापून टाकते. त्यामुळे याबाबत प्रशासनाने सजग राहण्याचीच गरज असल्याचे पर्यावरणप्रेमींचे मत आहे. दरम्यान, काही प्रमाणात तलावात जलपर्णी कायम राहिली तर तलावाचे नुकसान होणार नाही. मात्र, हेच प्रमाण वाढल्यास धोका निर्माण होण्याचीही भिती व्यक्त केली जात आहे.
तलाव परिसर नो व्हेईकल झोन म्हणून जाहीर करा
मेहरूण तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळून येते. मात्र, तलाव परिसरात वाढत जाणारा मानवी वावर या भागातील जैवविविधता, पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आणत आहे. त्यातच तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात वाहने देखील आणली जात असल्याने शांततेचा देखील भंग होत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने तलाव परिसर ‘नो व्हेईकल झोन’ जाहीर करण्याची मागणी नीर फाऊंडेशनकडून करण्यात आली आहे. याबाबतीत नीर फाऊंडेशन चे संचालक सागर महाजन यांनी मनपा आयुक्त व महापौरांना निवेदन देण्यात आले.
कोट.
तलाव परिसरात जलपर्णी ही किनाऱ्यालगत वाढली आहे. इतपत ही वनस्पती वाढल्यास तलावाला धोका नाही. तसेच वनस्पतीमुळे पक्षी व मासे यांना फायद्याची ठरते. मात्र, ही वनस्पती थांबलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढत असते. तलावाचे पाणी हे स्थिर असते. त्यामुळे भविष्यात ही वनस्पती तलावात वाढू शकते.
-डॉ.तन्वीर खान, वनस्पती अभ्यासक
जलपर्णी हे पक्ष्यांसाठी उत्तम खाद्य आहे. मात्र, त्याचे प्रमाण तलावात कमी राहिले पाहिजे. वाढत गेल्यास तलावाला धोका, मनपाने ही जलपर्णी काढल्यास इतर पोषक वनस्पती तलावात कशा वाढतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
-राजेंद्र गाडगीळ, पक्षी मित्र