जळगाव : कोविड उपचाराची परवानगी देण्यात आलेल्या खासगी रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारणीला आळा बसावा व त्यावर नियंत्रण रहावे म्हणून लेखा परीक्षणासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडून लेखा परीक्षण करण्यात येत आहे. यात काही तफावत आढळल्यास खाजगी रुग्णालयांकडून वसुली केली जाईल, असा इशारा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा इन्सिडेण्ट कमांडर गोरक्ष गाडीलकर यांनी दिला आहे. दरम्यान, या सर्व रुग्णालयांची गाडीलकर यांनी पाहणी करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.कोरोनाच्या संकटात दररोज नवनवे रुग्ण वाढत असून यासाठी शासकीय रुग्णालय, कोविड केअर सेंटर येथे रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र वाढती रुग्णसंख्या पाहता उपचारासाठी दहा रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे़ यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच शुल्क आकारणी व्हावी, असे आदेश देण्यात आले आहेत. असे असतानाही काही रुग्णालये अव्वाच्या सव्वा दर आकारत असल्याच्या तक्रारी वाढत आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशिक केले होते़ त्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीदेखील लेखा परीक्षणासाठी पथक नियुक्त करीत दर निश्चितीसंदर्भातही आदेश दिले. त्यानुसार पथकांकडून लेखा परीक्षण केले जात आहे.भीतीने होतात रुग्ण दाखलकोविड उपचाराची परवानगी देण्यात आलेल्या खासगी रुग्णालयांची इन्सिडेण्ट कमांडर गाडीलकर यांनी पाहणी केली. यामध्ये बहुतांश रुग्णांना लक्षणे नसले तरी ते भीतीने खाजगी रुग्णालयात दाखल होत आहेत. तसे पाहता सर्वसामान्य रुग्ण असल्यास त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात असले तरी त्या विषयी लेखा परीक्षण केले जात असून यास गती देण्यात यावी, अशा सूचना संबंधित पथकाला देण्यात आल्याचे गाडीलकर यांनी सांगितले.सरकारच्या सर्व व्यवस्थाखाजगी रुग्णालयांच्या भेटी दरम्यान गाडीलकर यांनी या रुग्णालयांमधील अति दक्षता विभाग, आॅक्सिजन पुरवठा व इतर सोयीसुविधांची पाहणी केली. या वेळी त्यांनी रुग्णांशी चर्चा करून त्यांना आधार दिला. या चर्चेत आवश्यकता नसताना अनेक जण खाजगी रुग्णालयात दाखल होत असून कोरोना रुग्णालय, कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड रुग्णलाय येथे पुरेसा बेडसह सर्व सुविधा उपलब्ध असून सर्वसामान्य नागरिकांनी याचा लाभ घेत खाजगी रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नसल्याचे आवाहन गाडीलकर यांनी केले आहे.
खाजगी रुग्णालयांच्या बिलांमध्ये तफावत आढळल्यास वसुली करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 12:18 PM