वडिलांचाही अपघातीच मृत्यू
सागर याचे वडील रमजान तडवी पोलीस दलात होते. सागर सहा वर्षाचा असताना नशिराबादजवळ अपघात होऊन त्यात ते गतप्राण झाले होते. वडीलांपाठोपाठ मुलाचाही अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत होती. सागर हा ३ फेब्रुवारी २०१२ रोजी अनुकंपा तत्वावर वडीलांच्या जागी पोलीस दलात रुजू झाला होता. पूर्वी तो रामानंद नगर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येच्या प्रकरणात तेथे त्याच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून त्याची बदली मुख्यालयात झाली होती. मधल्या काळात तो आरसीपीत कार्यरत होता. आता पंधरा दिवसासाठी त्याला शिर्डी येथे बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले होते.
साखरपुडा झाला, १४ फेब्रुवारीला होते लग्न
सागर याचा २२ नोव्हेंबर रोजी फैजपूर येथील मुलीशी साखरपुडा झाला होता. १४ फेब्रुवारी रोजी लग्न ठरले होते, तत्पूर्वीच अशी दुर्देवी घटना घडली. सागरच्या पश्चात आई, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. सागर हा एकुलता होता. आईचा आधारच गेल्याने तडवी कुटुंबावर मोठा दुखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस दलातील सहकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
जिंदगी रही तो फिर मिलेंगे दोस्तो, मौत का सिझन चल रहा है !
सागर तडवी या कर्मचाऱ्याने काही दिवसापूर्वीच टीकटॉकवर व्हिडीओ बनविला असून त्यात तो म्हणतो, ‘जिदंगी रही तो फिर मिलेंगे दोस्तो, मौत का सिझन चल रहा है! वादा नही कर सकते’ दहा सेंकदाच्या संवादाचा व्हिडीओ आता त्याच्याच मृत्यूनंतर व्हायरल होत आहे. ज्या अर्थी त्याने हा व्हिडीओ बनविला, त्याअर्थी सागर याला घटनेचे संकेत मिळाले होते की काय? अशीही चर्चा पोलीस दलात सुरु आहे. शनिवारी हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून शिर्डी बंदोबस्ताला जाण्यापूर्वी त्याने हा टीकटॉक व्हीडीओ तयार केल्याचे सांगण्यात येत आहे.