लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी सर्व पक्षीय बैठक तर होईल, मात्र यात पुरेशा जागा न मिळाल्यास वेगळा विचार होऊ शकतो, असे संकेत भाजपकडून दिले जात आहेत. या निवडणुकीसाठी काँग्रेस स्वबळाच्या तयारीत असल्याने त्यांना जागा वाढवून द्यायच्या झाल्या तरी कोणीही आपल्या जागा सोडायला तयार नसल्याचे सांगितले जात आहे.
सहकारी संस्थांच्या निवडणुका या ३१ ऑगस्टपर्यंत स्थगित ठेवण्यात आल्या आहेत; मात्र जिल्हा बँकेसाठी सहकार व पणन विभागाने काही दिवसांपूर्वी आदेश काढून पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश काढले होते. तेव्हापासून जिल्हा बँकेसाठी राजकीय पक्षांकडून तयारीला वेग आला आहे. गेल्या पंचवार्षिकप्रमाणेच यंदाही जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यात यावी यासाठी अनेक नेते इच्छुक आहेत; मात्र काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे.
ही निवडणूक अविरोध होण्यासाठी हालचाली सुरू आहेत. असे असले तरी या दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये चांगलाच तणाव वाढला. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्यासंदर्भात ईडीकडून होणारी कारवाई या सर्व प्रकारामुळे सोमवारच्या बैठकीत काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप जागा सोडणार नाही
जिल्हा बँकेत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांना प्रत्येकी सहा तर कॉंग्रेसला तीन जागा देण्याचा फाॅर्म्युला ठरला; मात्र काँग्रेसच्या वाट्याला जागा कमी येत असल्याने काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या बैठकीत कॉँग्रेसला जागा वाढवून दिल्या जातात की नाही, या विषयी सध्या विचारविनिमय सुरू आहे. असे असले तरी कोणताच पक्ष आपल्या जागा कमी होऊ देण्यास तयार नाही. इतकेच नव्हे पुरेशा जागा मिळाल्या नाही तर सर्वांना सर्व मार्ग मोकळे असल्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांचे म्हणणे आहे. सर्वपक्षीय बैठक होईल व निवडणूक अविरोधसाठी प्रयत्न राहणारच आहे, असेही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. मात्र भाजपला पुरेशा जागा मिळणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी नमूद केले.