जळगाव : आगामी जि.प. व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये वरच्या पातळीवरून पक्षाकडून आदेश आले तर महाविकास आघाडी म्हणून लढण्याची तयारी आहे. मात्र, प्रत्येक पक्षात काही नारद असतात, त्या-त्या पक्षांनी अशा नारदांना सांभाळले तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित लढेल असे सांगत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना नाव न घेता टोला लगावला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे रविवारी शहरात आले होते. यादरम्यान अजिंठा विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शिवसेना स्वबळावर लढेल किंवा महाविकास आघाडी म्हणून लढेल, आतापर्यंत या निवडणुका स्वबळावरच लढविल्या गेल्या आहेत. मात्र, गेल्या महिन्यात राज्यात झालेल्या १०८ नगरपंचायतीच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढविल्या गेल्या. जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व शिवसेना हे पक्ष स्वतंत्र लढले. तरीही आगामी निवडणुकांबाबत वरिष्ठ पातळीवरूनचे आदेश येतील. ते आदेश सर्व पक्ष पाळतील अशी अपेक्षा आहे.
राज्यातील नुकत्याच झालेल्या निवडणुकांमधील चित्र बघितलं तर राज्यात १०८ नगरपालिकांच्या निवडणुक झाल्या. त्यात केवळ ९ नगरपालिकांवर भाजपचा नगराध्यक्ष झाला. तर इतर सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष झाले असल्याचेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यात देखील महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढू शकतो. मात्र, प्रत्येक पक्षाने त्यांच्या पक्षातील नारदांना सांभाळण्याची गरज असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.