जळगाव : राज्य शासनाने १ मे पर्यंत घातलेले निर्बंध आणखी कडक करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने देखील आदेश पारीत केले आहेत. आता नव्या आदेशानुसार जिल्हाभरात लग्नाचा सोहळा फक्त २५ लोकांच्या उपस्थितीत आणि दोन तासात पार पाडण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये देखील फक्त १५ टक्के उपस्थिती निश्चित करण्यात आली आहे. तसेच खासगी आणि सार्वजनिक प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आंतरजिल्हा किंवा आंतर शहर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही आता अँटीजेन टेस्ट होणार आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, सर्व शासकीय कार्यालये हे कोविड नियमांचे पालन करून एकुण कर्मचारी क्षमतेच्या १५ टक्के कर्मचारी क्षमतेसह उपस्थितीत सुरू राहतील. आपत्ती व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या कार्यालयांना यातुन सुट राहील. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीने इतर शासकीय कार्यालयांमध्ये उपस्थिती वाढवण्यासंदर्भात विभागप्रमुखांनी निर्णय घ्यावा. तसेच इतर कार्यालयांमध्ये एकुण कर्मचारी क्षमतेच्या १५ टक्के किंवा जास्तीत जास्त पाच कर्मचारी यांची उपस्थिती राहील.
लग्न समारंभासाठी फक्त २५ लोकांची उपस्थिती आणि फक्त दोन तासातच विवाह सोहळा पार पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कुटुंबास ५० हजाराचा दंड आणि ही जागा कोविडचे निवारण होई पर्यंत बंद ठेवण्याचे आदेशात म्हटले आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ५० टक्के आसन क्षमतेने सुरू राहतील. तसेच प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्यास बंदी राहील. तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे किंवा बसेसमधून आंतरजिल्हा किंवा आंतरशहर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील १४ दिवस गृहविलगीकरणात रहावे लागणार आहे. सर्व प्रवासी थांब्यांवर अँटीजेन तपासणी करून त्याचा खर्च संबंधित प्रवाशांकडून वसुल करावा. तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने स्थानिक परिस्थितीनुसार ठराविक ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का मारावा किंवा नाही याचा निर्णय घ्यावा. असेही आदेशात म्हटले आहे.
बाहेरून येणारे सर्व प्रवाशी १४ दिवस होम क्वारंटाईन
खासगी बसेस या ५० टक्के बैठक क्षमतेसह सुरू राहतील. तसेच प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्यास बंदी राहील.
आंतरशहर किंवा आंतर जिल्ह्यातंर्गत खासगी बस सेवांना एका शहरात जास्तित जास्त दोन थांबे घेता येतील त्यासाठी नगर पलिका किंवा महापालिका यांना माहिती द्यावी लागेल. ज्या ठिकाणी थांब्यांवर प्रवासी उतरणार आहे. त्यांच्या सर्व प्रवाशांच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का मारावा. हा शिक्का खासगी बसचालवणाऱ्या कंपनीने मारावा.
बसमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांची थर्मल गनच्या सहाय्याने तपासणी करावी. कोविडची लक्षणे दिसल्यास जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये संदर्भित करावे.
सर्वप्रवाशांची होणार अँटीजेन चाचणी
स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रवाशी थांब्यांवर एका स्वतंत्र लॅबला परवानगी देऊन येणाऱ्या प्रवाशांची अंटीजेन चाचणी करावी. तसेच याबाबतचा खर्च हा संबंधित प्रवासी अथवा बस सेवा पुरवठादार यांनी करावा. नियमांचे उल्लंघन केल्यास बस सेवा पुरवठादाराला दहा हजाराचा दंड करण्यात येईल.