हे ईश्वरा ! मी तुला बघितले नाही, तरी सुद्धा माझा विश्वास आहे तू कोठे ना कोठे निश्चित आहे, कारण की, माझा श्वासोश्वास सुरु आहे, पक्षी उडत आहेत, वारा वाहात आहे, चंद्र व सूर्य आपल्या वेळेवर येत आहेत हे सर्व तू असण्याचे, तुझे अस्तित्व असण्याचेच प्रमाण आहे.तू माणसाला माणसाशी प्रेम करावयास शिकवले, मोठ्यांचा आदर-सन्मान करण्याचे तू शिकवले, प्रत्येक प्रकारचा आनंद तू दिला, मी प्रत्येक प्रकाराने तुझा आभारी आहे की तू माणसाला माणुसकी देवून त्याला निर्माण केले, त्याच्यात भावना भरल्या, त्याला मन दिले, बुद्धी दिली हा सगळा तुझा चमत्कार आहे. परंतु आजचा माणूस तुझ्या आठवणीला तुझ्या उपकाराला विसरत आहे. तू त्याला माफ कर तू ममतेचा सागर आहे, तुझ्याहून मोठा कोणीही नाही. मृत्यूनंतर मी वा माझा आत्मा कोठे जाईल याबद्दल काहीही माहिती नाही, परंतु ज्या दिवशी तुझे दर्शन होतील तो दिवस मी धन्य समजेल.मी प्रार्थना करतो की, प्रत्येक व्यक्तीस चांगले आरोग्य दे. आमच्या देशात राहणाऱ्या व्यक्तींना संकटापासून वाचव, त्यांना खरा स्वच्छ मार्ग दाखव. मानव समाजातील ज्या व्यक्ती अंधविश्वासात आपले मौल्यवान आयुष्य घालवत आहे त्यांचे डोळे उघड.हे ईश्वरा! माझ्या आई -वडीलांची कृपा दृष्टी आशिर्वाद माझ्या मस्तकी ठेव. मी जेथून रोजी रोटी कमवतो तेथे खुशहालीचे भांडार भरु दे. माझ्या इमानाला इतके मजबूत बनव की जे कार्य तुला मुळीच आवडत नाही असे कार्य कधीच करणार नाही, त्याबद्दल परावृत्त कर. मला सदैव सत्याच्या मार्गावर चालण्याची हिंमत- शक्ती दे. माझ्या कर्तव्यापासून मी कधीही विचलीत होणार नाही, अशी शक्ती दे-बळ दे! पूर, दुष्काळ, अग्नी आणि वीज यांच्यापासून देशाचा बचाव कर. तू मला जसे ठेवत आहे त्याबद्दल माझ्यावर तुझे अनंत उपकार आहेत. त्याबद्दल तुझ्यापुढे नतमस्तक होतो. तुझ्या स्रेहाशिर्वादानेच माझे उर्वरित आयुष्य व्यतीत होत आहे.-प्रेमचंद बरडिया, माजी प्राध्यापक
स्वच्छ मनाने प्रार्थना केली तर आयुष्यभर सुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 7:29 PM