रिॲलिटी चेक
अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलाव परिसरात जे वृक्ष आहेत. ते वाचविण्यासाठी कोणत्याही उपायोजना होत नाहीत, तर दुसरीकडे मात्र जिथे वृक्ष नाहीत त्याठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येईल, त्यावर मात्र आतापासूनच लाखोंचा खर्च होत असल्याचे धक्कादायक चित्र मेहरुण तलाव परिसरात दिसून येत आहे.
मेहरूण तलाव परिसराचा विकास करण्यासाठी २०१८मध्ये पर्यटन विभागाकडून ५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यात आता काही कामांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये अशी कामे होत आहेत, की ज्या कामांचा उपयोग येत्या काही काळात नागरिकांना होणारच नाही. मेहरूण तलावाच्या मुख्य समस्यांकडे दुर्लक्ष करून, ज्याची गरज नाही त्यावर मात्र लाखोंचा खर्च केला जात आहे.
वृक्ष लागवड करण्याआधीच ओटे तयार
मोठ्या ठेरेदार वृक्षालगत नागरिकांना बसण्यासाठी ओटा तयार करण्यात येतो. मात्र, मेहरूण तलावाच्या परिसरातील डेरेदार वृक्षांकडे दुर्लक्ष करून ज्याठिकाणी अद्याप वृक्षाची लागवडच करण्यात आलेली नाही. अशा ठिकाणी ओटे तयार करून घेतले जात आहेत. या ओट्यांचा फायदा कसा होईल ? हे सांगणेदेखील कठीण आहे. केवळ बांधकाम करायचे आणि बिले काढून मोकळे व्हायचे, असा प्रकार बांधकाम विभागात सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्या बांधकामाचा उपयोग नागरिकांसाठी होईल की नाही ? याचा विचारदेखील होताना दिसून येत नाही.
आहेत त्या वृक्षांकडे मात्र दुर्लक्ष
मेहरुण तलाव परिसरातील डेरेदार अनेक वृक्षांची मुळे उघडी पडू लागली आहेत. काही महिन्यांपूर्वी तलाव परिसरातील तीन ते चार वृक्ष कोसळले होते. या वृक्षांच्या उघड्या पडलेल्या मुळांचे संरक्षण करण्यासाठी कोणतीही तरतूद किंवा नियोजन होत नसताना दुसरीकडे मात्र इतर कामांवर लाखोंची उधळपट्टी केली जात आहे.
सुशोभिकरण नाही तर शुध्दीकरणाची गरज
मेहरूण तलावाच्या मुख्य समस्यांबाबत अजूनही प्रशासनाला जाग येताना दिसून येत नाही. मेहरूण तलावात सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे प्रदूषण निर्माण होऊन तलावातील जैवविविधता धोक्यात आली आहे. त्यावर उपाययोजना न करता बाहेरील देखाव्यावर मात्र खर्च होत आहे.
कोट....
अतिशय चुकीची पध्दत आहे. पार तयार करताना आधी वृक्षाचा बुंधा मोठा होऊ दिला जातो. मात्र, याठिकाणी तर वृक्ष नसतानाच ओटे तयार केले जात आहेत. यामागे केवळ पैसे खाण्याचे काम सुरू आहे. यावर आवाज उठविण्याची गरज आहे. याबाबत महापौर, आयुक्तांसह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली जाईल.
-सुजाता देशपांडे, भारती प्रतिष्ठान
मुळात मेहरूण तलाव परिसरात जे डेरेदार वृक्ष आहेत. ते वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र, ज्याठिकाणी खर्च करण्याची गरजच नाही त्याठिकाणी खर्च करून निधीचा अपव्यय होत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारावाच लागेल. मुख्य समस्येकडे दुर्लक्ष करून अशा प्रकारे निधीची उधळपट्टी करणे चुकीचेच आहे.
-प्रणिलसिंह चौधरी, संचालक, योगी फाऊंडेशन