लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड महिन्यापासून ब्रेक द चेन अंतर्गत मोबाईल रिटेलर्सने व्यवहार बंद ठेवले आहेत. परंतु या काळात विदेशी ई-कॉमर्स कंपन्या शासनाच्या नियमांना बगल देत सर्रास इतर वस्तू विक्री करत आहेत. या नियमबाह्य प्रकारांना आळा बसण्यासाठी कडक पावलं उचलावीत अशी मागणी ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासोबतच विविध मागण्या देखील करण्यात आल्या.
लॉकडाऊन काळातील विविध समस्या मांडण्यासाठी असोसिएशनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी असोसिएशनच्या ठिकठिकाणच्या पदाधिकाऱ्यांसह जळगाव येथून विभागीय अध्यक्ष प्रशांत पांडे हे सहभागी झाले होते.
वीज बिलात सवलत मिळावी
जिल्ह्यात २३० हून अधिक दुकाने आहे. सध्या ही मोबाईल दुकाने बंद असल्याने या काळात वीज बिलांच्या स्थिर आकारात सवलत मिळावी, लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर ग्राहकांना दुकानात येऊन खरेदी करता यावी यासाठी व्यावसायिक व त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे, असोसिएशनच्या विविध समस्या सरकारकडे मांडण्यासाठी व सोडवण्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्यात यावा अशा मागण्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे करण्यात आल्या.