तोंडापूर, ता. जामनेर : येथे गेल्या महिनाभरापासून सर्रासपणे अवैध वृक्षतोड सुरु असून भर दिवसा तोंडापूरच्या जंगल भागातून तसेच शेतातील बांधाऱ्यावर असलेले कडूनिंब, सागवान, आभेटा, खैर या सारख्या डेरेदार वृक्षाची कत्तल केली जात आहे. वन विभागाचे अधिकारी मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वृक्षप्रेमींकडून केला जात आहे.तोंडापूर हे गाव जळगाव - औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असून गावाला लागूनच अजिंठ्याचा डोंगर आहे. त्यामुळे या परिसरात तोंडापूरसह जामनेर व अजिंठ्याच्या व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. हे लाकूड व्यापारी वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी ठेऊन आपला व्यवसाय करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वृक्षतोडीमुळे संपूर्ण जंगल ओसाड झाल्याने जंगलातील माकडे, अस्वल, हरीण, रान डुक्कर या सारखे वन्य प्राणी गावाकडे धाव घेत असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. वन विभागाने लक्ष घालावे अशी मागणी प्राणीमित्र प्रभाकर साळवे तसेच वृक्ष प्रेमींकडून होत आहे.
तोंडापूर परिसरात अवैध वृक्षतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 7:03 PM