अजय पाटील / ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 14 - ‘आई ला देवाची व्याख्या दिली गेली आह़े आपल्या मुलांना काय हवे आहे, हे आईला माहिती असते. चाळीसगाव तालुक्यातील वाघळी या छोटय़ाशा गावात माङो बालपण गेले. आई-वडील गावातच शेती करायचे, आई अशिक्षीत आहे, मात्र तिला असलेल्या शिक्षणाच्या महत्त्वामुळे परिस्थिती जेम-तेम असल्यावरदेखील आईने चारही भावंडांचे शिक्षण पूर्ण केले. आज मी शिक्षणाधिकारी पदार्पयत पोहचलो असल्याची भावना जि.प. माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी व्यक्त केली. मातृदिनानिमित्त आईबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले की, वाघळी येथे वडिलांच्या नावावर 4 एकर शेती होती. मात्र शेतात पाणी नसल्याने पावसाच्या पाण्यावर दोन हंगाम घेतले जात होते. शेतीशिवाय दुसरा व्यवसाय नसल्याने अनेकदा आर्थिक अडचणींना कुंटुबाला तोंड द्यावे लागत होते. मात्र आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे हे तीला नेहमी वाटायचे.ऊन असो वा पाऊस अशा स्थितीतही आई शेतात काम करायची, त्यामुळे शाळेला सुट्टी असायची त्यावेळेस आई-वडिलांना मदत होईल या हेतूने शेतात काम करायला जायचो. मात्र, शेतात गेल्यावर आईने कधीही मला शेतात काम करू दिले नाही. तू फक्त अभ्यासालाच महत्व दे असा सल्ला आईचा होता. तसेच अनेकदा शाळेचे शुल्क भरायला देखील पैसे नसायचे अशावेळी आई कुणाकडूनही उधार पैसे आणून आमच्या शाळेची फी भरून घेत असे. जीवनात कितीही मोठे यश मिळाले तरी आई शिवाय जीवनात कुणीही महत्वाचे नसते. पहिलीच्या वर्गापासून ते शिक्षणाधिकारीर्पयतच्या प्रवासात अनेकदा अडचणी आल्या, मात्र प्रत्येक अडचणीच्यावेळी नेहमी आई पाठीशी राहिल्याने नेहमी अडचणींवर मात करता आली. आताही अनेकदा काही अडचणी आल्यास आईचा सल्ला घेत असल्याचे देवीदास महाजन यांनी सांगितले.
अशिक्षित आईने केले शिक्षणाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2017 12:46 PM