संजय पाटीलअमळनेर, जि. जळगाव : तरुणांमध्ये रक्तदान चळवळ जागृत यासाठी मनाशी निश्चय करून कडाक्याच्या थंडीचा विचार न करता घर आणि कुटुंबापासून दूर जाऊन कोलकता येथील जयदेव राऊत हे सायकलवर १३ राज्यांचे भ्रमण करीत आहे. ते ५ रोजी अमळनेरात पोहचले. त्या वेळी जीवनश्री रक्तपेढी तथा अमळनेर युवा मित्र परिवरातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.भारत हा युवा देश असून या देशाची युवा शक्ती वाया जात आहे. त्याचा सदुपयोग व्हावा आणि प्रदूषण रोखण्यासाठी तारुणांनी व्यायामकडे वळावे या उद्देशाने पश्चिम बंगाल मधील कोलकत्ता येथील जयदेव राऊत नावाचा मध्यमवयीन तरुण ५ आॅक्टोबर २०१८ पासून सायकलवर निघाला. सायकलला भारताचा तिरंगा ध्वज लावून मागे व पुढे रक्तदानचे आवाहन करणारे फलक लावून झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरातमार्गे महाराष्ट्रात पोहचला. रस्त्याने येताना प्रत्येक ठिकाणी रक्तपेढीत जाऊन रक्तदानचे आवाहन करणाऱ्या त्या त्या भाषेतील पत्रिका घेऊन त्याचा प्रचार, रोटरी, लायन्स क्लब सारख्या सेवाभावी संस्थांच्या मदतीने युवकांशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शन करत, प्रेरित करत रस्त्यात गाझियाबाद येथे स्वत:ही रक्तदान केले.त्यानंतर जयदेव मुंबई पोहचला. मुंबई येथून नाशिक, मालेगाव, धुळेमार्गे अमळनेर येथे ५ रोजी पोहचला. त्याने आतापर्यंत स्वत: ३६ वेळा रक्तदान केले आहे. अमळनेर येथे आल्यावर त्याने रक्तदान चळवळ चालवणारे युवा मित्रपरिवारचे मनोज शिंगणे, राहुल कांजर, प्रथमेश भोसले, गौरव पाटील, ऋत्विक भामरे, राहुल अहिरे, भूषण चौधरी, विशाल पवार, हितेश नारखेडे, विपुल पाटील, तुळशीदास पाटील, जिगर शिंदे, राजेश खराटे, रोहित पाटील, अक्षय सोनवणे, विकास पाटील, प्रथमेश पाटील, सनी गायकवाड यांना मार्गदर्शन करून जास्तीत जास्त रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन केले.देशातील प्रत्येक रक्तपेढीत १०० टक्के रक्त उपलब्ध झाले पाहिजे तोपर्यंत चळवळ चालू ठेवा, नागरिकांना प्रेरित करा असे सांगून रक्तदानाचे महत्व व फायदा पटवून सांगितले. अमळनेर येथे मंगळ ग्रह मंदिरात मुक्काम केल्यानंतर चोपडा येथे रवाना झाले. तेथून जळगाव, अमरावती, नागपूरमार्गे परत कोलकता रवाना होणार आहे.
रक्तदान चळवळीसाठी सायकलवर देशभ्रमंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 4:06 PM