लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात सध्या पाणीपुरवठा योजना आणि भूमिगत गटारांच्या योजनेचे काम सुरू आहे. मात्र, त्यात बऱ्याच तांत्रिक चुका राहतात. पाइप जमिनीत टाकण्यासाठी चारी खोदल्यानंतर पुन्हा बुजताना थरा-थराने मुरूम न भरल्याने शहरातील रस्ते असमतोल झाले आहेत. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकीचे अपघातदेखील वाढले असल्याचे निवृत्त स्थापत्य अभियंता विनायक काळे यांनी सांगितले.
काळे यांनी देशातील विविध राज्यांत पाणीपुरवठा योजनांसाठी अभियंता म्हणून काम केले आहे. निवृत्तीच्या वेळी ते नागपूर मेट्रो प्रकल्पात स्थापत्य अभियंता म्हणून कार्यरत होते. ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.
प्रश्न - शहरात सध्या विविध विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे खड्डे होतात आणि अपघातांचे प्रमाणदेखील वाढते, हे कसे टाळता येऊ शकते.
काळे - सध्या पाणीपुरवठा योजना आणि भूमिगत गटारांच्या योजनेचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्यात चारी खोदली जाते. पाइप जमिनीत टाकला जातो. मात्र, हे करताना जमिनीत काढलेला मुरूम हा टप्प्याटप्प्याने थरावर थर रचत पुन्हा आत टाकावा लागतो आणि त्याला नंतर रोलरने आणखी आत दाबावा लागतो. त्याचे सपाटीकरण केले जाते. त्यानंतर संबंधित विभागाचे अभियंता येऊन त्याची पाहणी करतात. सपाटीकरण आणि आतील मुरूम नीट कॉम्पॅक्ट झाला असेल तरच त्यावर डांबरीकरण केले जाते.
प्रश्न : शहरात सुरू असलेल्या कामांमुळे धूळ खूप झाली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना श्वसनाचे विकार जडत आहेत. हे कसे टाळता येऊ शकते.
काळे - खोदकाम करताना धूळ उडणार हे अपेक्षित असते. त्यामुळे धुळीवर नियंत्रण असावे यासाठी खोदकाम करताना त्या ठिकाणी पाण्याचा शिडकावा मारला जातो. त्यामुळे धुळीवर नियंत्रण असते. दगड गोटे हे रस्त्यावर जाऊन त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यावरही ठेकेदाराने नियंत्रण ठेवले पाहिजे. पाणी मारताना चिखल होऊ नये. त्याऐवजी पाणी शिंपडले पाहिजे. वापरल्या जाणाऱ्या मशिन्स या अद्ययावत असल्या पाहिजेत. त्यातून ध्वनी प्रदूषण किती व्हावे, यावर देखील मर्यादा आहे.
प्रश्न : विकास कामे सुरू असताना त्यात सुरक्षा कशी पाळली गेली पाहिजे.
काळे - सुरक्षेचा मुद्दा हा सर्वांत महत्त्वाचा आहे. ठेकेदाराला त्यात नागरिकांची सुरक्षा, काम करणाऱ्या मजुरांची सुरक्षादेखील बघावी लागते. त्यांना काम सुरू असताना कोणताही इजा होऊ नये, यासाठी सुरक्षा साधनांचा वापर केला पाहिजे. जेथे काम करणार आहे त्याठिकाणी नागरिकांना काम किती होणार आहे. याची माहिती असावी. चारी खोदण्याचे आणि ती बुजवण्याचे काम हे दिवसा केले जावे. जेथे रात्री काम केले जाणार आहे. त्याची संबंधित विभागाकडून पूर्वपरवानगी घेणे अपेक्षित असते.
कोट - ज्या रहिवासी भागात काम केले जाणार आहे. तेथील नागरिकांना त्या कामाची पूर्वसूचना देणे बंधनकारक असते. त्यासोबतच हे सर्व काम होईपर्यंत धुळीवर नियंत्रणासाठी पाण्याचा शिडकावा मारला पाहिजे. तसेच रस्ते खोदताना आणि नंतर बुजवून डांबरीकरण करताना ते काम नियमानुसारच झाले पाहिजे.
- विनायक काळे, निवृत्त स्थापत्य अभियंता, नागपूर मेट्रो.