जळगाव : कोरोना लसीकरणानंतर लाभार्थ्यास कुठल्याही प्रकारचा त्रास झाल्यास आरोग्य केंद्र, कोरोना नियंत्रण कक्ष येथे संपर्क साधता येणार आहे. लाभार्थ्यांस जर काही त्रास झाला तर त्याठिकाणी उपचाराची आवश्यक साधनसामुग्रीची किटही उपलब्ध राहणार असून यासाठी शासकीय यंत्रणेसह खासगी डॉक्टरांकडून उपचार उपलब्ध होणार आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी यावेळी सांगितले. यासाठी आयएमएनेदेखील पुढाकार घेतला आहे. दरम्यान, लसीकरणाविषयी कोणी चुकीची माहिती पसरवत असल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाणार असून या दरम्यान सोशल मीडियावरही नजर राहणार आहे.
यांना लसीकरणातून वगळले
तीन टप्प्यांत होणाऱ्या लसीकरणात प्रत्येक टप्प्यांत गर्भवती महिला, स्तनदा माता, रक्तपात अधिक होणाऱ्या व्यक्ती.
असे आहे तीन टप्पे
१) आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी
२) कोरोना उपाययोजनांमध्ये पहिल्या फळीत काम करणारे विभाग.
३) सामान्य नागरिक
जिल्ह्यासाठी ४० ते ४२ लाख जणांना दोन डोस
सध्या जिल्ह्यासाठी २४ हजार ३२० लसीचे डोस मिळाले असून दुसऱ्या टप्प्यासाठी असणाऱ्या व्यक्तींची संख्या व तिसऱ्या टप्प्यात सामान्यांची संख्या यानुसार लस उपलब्ध होतील. त्यामध्ये गर्भवती महिला, स्तनदा माता, रक्तपात अधिक होणाऱ्या व्यक्ती यांची संख्यावगळता जिल्ह्यासाठी ४० ते ४२ लाख लसीचे डोस लागणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
दर आठवड्याला चार सत्र
दर आठवड्याला चार सत्र राबविण्यात येणार असून एका सत्रात १०० जणांना लसीकरण करण्यात येणार आहे.
ॲपमध्ये यादी उपलब्ध
एका केंद्रावर एका सत्रात १०० जणांना लस द्यावयाची असून यासाठी आरोग्य विभागातील १९ ९५१ जणांची यादी असून कोविन ॲपद्वारे त्यातील १०० जणांची नावे दररोज ठरली जाणार आहे. त्यानुसार त्या १०० जणांना संदेश जाणार आहे.
दीड वर्षांनंतर ‘सक्सेस रेट’ कळणार
लसीकरणासाठी संमतीपत्र घेतले जाणार असून लसीकरणानंतर संबंधितांना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. लस घेतल्यानंतर ती किती यशस्वी ठरली हे दीड वर्षांनंतर स्पष्ट होणार आहे.
चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर कारवाई
जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्याने कोणीही चुकीची माहिती अथवा अफवा पसरवू नये. चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, तसेच नागरिकांनीही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. कोणी चुकीची माहिती पसरवत असल्यास प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.