जळगाव : यंदाच्या खरीप हंगामात जुलै महिन्यात कमी पाऊस झाल्याने व पावसाचा मोठा खंड पडल्याने ७० टक्के उडीद, मुगाच्या पिकाचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हाताशी पिक येण्याची शक्यता धूसर होत आहे. त्यामुळे या नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करावे, अशी मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
या विषयी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १७ ऑगस्टनंतर झालेल्या सततच्या पावसाने, दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या पिकालादेखील कोंब फुटलेले आहेत. यामुळे उडीद व मुगाचे थोडेफार येणारे उत्पादन देखील पूर्णपणे वाया गेलेले आहे. जिल्ह्यात उडीदाची २० हजार ९११ हेक्टर व मुगाची २२ हजार ९२४ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली आहे. हे पिकं पूर्णपणे वाया गेलेले असून शेतकऱ्यांना यापासून कुठल्याही प्रकारचे उत्पन्न मिळणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे तातडीने महसूल व कृषी विभागाचे यंत्रणेमार्फत प्रत्येक शेतकऱ्यांचे पंचनामे करून झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनास सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
ई-पीक पाहणी ॲपमधील पिक पेऱ्याची सक्ती नको
बहुतांश शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी ॲप बाबत परिपूर्ण माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे या ॲपबाबत शेतकऱ्यांना सक्ती करण्यात येऊ नये, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.