ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.20- अभियांत्रिकीचे शिक्षण किंवा तंत्रज्ञानाचे अध्ययन व अध्यापन आणि गणित यांचा परस्परांशी महत्त्वाचा संबंध आहे. गणिताशिवाय अभियंता घडणारच नाही. त्यामुळे प्राथमिक किंवा त्यापुढील शिक्षणात गणित विषय पर्याय म्हणून घेऊ नये. गणित विषय अभ्यासक्रमात राहीलाच पाहीजे. अन्यथा पात्रताधारक विद्यार्थी घडणार नाही, असे मत डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) कुलगुरू डॉ.व्ही.एम.गायकर यांनी मंगळवारी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित बाटूच्या उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात व्यक्त केले.
शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात सकाळी हा कार्यक्रम झाला. या वेळी बाटूचे कुलसचिव डॉ.एस.एस.भामरे, बाटूचे प्रा.डॉ.प्रदीप कट्टी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील डॉ.आर.डी.कोकाटे, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.जी.अराजपुरे, उपप्राचार्य प्रवीण फालक, जे.टी.महाजन अभियांत्रिकीचे उपाध्यक्ष विजय झोपे, गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
सीव्हील अभियांत्रिकी शिकतात, पण पूल बांधता येत नाही
अभियंते पदवीपुरते घडविले जातात. शिक्षकही अभ्यासक्रम पूर्ण करायच्या मागे असतात. पण जी माहिती विद्याथ्र्याना पुढे उपयुक्त असते, त्या माहितीचा उपयोग ते नोकरीसाठी करू शकतील, उद्योगासाठी करू शकतील ती माहितीदेखील वर्गात मिळायला हवी. अप्रशिक्षित शिक्षक शिकवितात, असेही निदर्शनास येते. विद्यार्थीदेखील चार वर्षे वर्गात अभ्यास केला, वाचन केले, पदवी घेतली म्हणजे अभियंते झाले असे समजतात. पण फक्त पदवीच्या शिक्क्यापुरते अभियंते नसावेत. त्यांना प्रात्यक्षिके, प्रत्यक्ष उद्योगात कसे काम करतात हे समजले पाहीजे. जे ऑटोमोबाईल शाखेचा अभ्यास करतात त्यांना भंगार चारचाकीचे सुटे भाग मोकळे करणे, त्याचा अभ्यास असला पाहीजे. अनेकदा स्थापत्य अभियांत्रिकीची (सीव्हील) पदवी घेतात, पण पूल बांधण्यासाठी नियुक्ती झाली तर ते काम येत नाही, असे व्हायला नको. बाटू प्रशिक्षित, उद्योगांना अपेक्षित असे अभियंते तयार करणारा अभ्यासक्रम देणार आहे. त्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची गरज असेल, असेही डॉ.गायकर म्हणाले.
आयआयटी, एनआयटीच्या समकक्ष काम व्हावे
जगात तंत्रज्ञान, उद्योगांमध्ये जे बदल घडतात, जे नावीन्य असते त्यासंबंधीची माहिती, अभ्यासक्रम प्रथम आयआयटी, एनआयटीत येतो. नंतर इतर संस्थांमध्ये हे अभ्यासक्रम येतात. पण जगात जे बदल घडतात, जे नवे अभ्यासक्रम येतात ते एकाच वेळी सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये, संस्था, राज्य शासनाच्या विद्यापीठांमध्ये यावेत. आयआयटीच्या समकक्ष बाटूचे काम न्यायचे आहे, असेही कुलगुरूडॉ.गायकर म्हणाले.