लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध १ जूनपासून शिथिल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या निर्णयांची अंमलबजावणी करताना व्यापारी बांधवांचा विचार करावा, अशी मागणी जिल्हा व्यापारी महामंडळाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. व्यापारी महामंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील निवेदन पाठवले आहे.
जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, सचिव ललित बरडीया, युसूफ मकरा, अनिल कांकरिया, सचिन चोरडिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे, की, व्यापारी बांधवांनी लॉकडाऊनच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. अनेक जण त्यात आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडले आहेत. कोणतेही उत्पन्न नसताना कर्मचाऱ्यांचा पगार, बँकांचे हफ्ते, भाडे, लाईट बिल यांचे व्यवस्थापन करावे लागत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. १ जूनपासून निर्बंध शिथिल होत असल्याने आता तरी नवीन नियमांची अंमलबजावणी करताना व्यापारी वर्गाचा विचार करावा, तसेच आर्थिक स्थिती पूर्ववत होण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.