लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जामनेर येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवरील व्यापारी संकुलाच्या चौकशीसाठी आलेल्या त्रिसदस्यीय समितीने सलग दुसऱ्या दिवशी या संकुलाबाबतच्या सर्व कागदपत्रांची सखोल चौकशी करून याच्या सर्व साक्षांकित प्रत ताब्यात घेतल्या आहेत. समिती पुन्हा पुढील आठवड्यात येऊन चौकशी करणार आहे. दरम्यान, शुक्रवारी या प्रकरणातील तक्रारदार ॲड. विजय पाटील यांनी समितीच्या सदस्यांची भेट घेतली.
सहायक आयुक्त मनिष सांगळे, सहाय्यक आयुक्त राजन पाटील, लेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे हे या संकुलाच्या चौकशीसाठी गुरूवारी जिल्हा परिषदेत आले होते. गुरूवारी दिवसभर तपासणी केल्यानंतर त्यांनी शुक्रवारी पुन्हा कादगपत्रांची तपासणी केली. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून याची माहिती घेतली. ही प्राथमिक चौकशी असल्याचे त्यांनी गुरूवारीच स्पष्ट केले होते. या कागपत्र तपासणीला अधिक कालावधी लागेल असेही त्यांनी सांगितले होते. मात्र, कागदपत्रांची बारकाईने तपासणी होत आहे. यात झालेले ठराव यांचीही तपासणी होत आहे. दरम्यान, अधिक माहितीसाठी समितीने सर्वच कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती आपल्या सोबत घेत शुक्रवारी समिती दुपारी रवाना झाली. दरम्यान, तक्रारदार ॲड. विजय पाटील यांनी समितीची भेट घेऊन तासभर चर्चा केली. शिवाय त्यांच्याकडील काही कागदपत्रेही समितीला दिली. यावेळी राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष तथा जि.प.सदस्य रवींद्र पाटील, अशोक लाडवंजारी, रवींद्र देशमुख, सुनील माळी, धवल पाटील, गोटू चौधरी आदी उपस्थित होते.
अधिकरी द्या पण जामनेर, जळगावचे नको
या व्यापारी संकुलाच्या बांधकामाची परवानगी किती होती ? बांधकाम किती झाले, अतिक्रमण किती झाले, याचे तांत्रिक व बांधकाम क्षेत्राचे ज्ञान असलेला अधिकारी या समितीत हवे आहेत. मात्र, ते जळगाव महापालिका किंवा जामनेर नगरपालिकेशी संबधित नसावेत, अशी मागणी ॲड. विजय पाटील यांनी समितीकडे केली आहे. जामनेर नगरपालिकेत गिरीश महाजन यांची सत्ता आहे? व जळगाव महानगरपालिकेततील विविध अधिकारी हे खटोड यांच्याशी संबंधित आहे? व हे अधिकारी सदर समितीची दिशाभूल करू शकतात, असेही त्यांनी समितीला सांगितले. जमीन खरेदी करत असताना झालेल्या कागदपत्रांची चौकशी करण्यात यावी, अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान, येत्या दोन आठवड्यात समिती या संकुलाला व शाळेला भेट देऊन चौकशी करणार असल्याचे आश्वासन समितीने दिले असल्याचे ॲड. विजय पाटील यांनी सांगितले.