कोरोना परिणाम : व्यापारी किरकोळ विक्रेते म्हणतात,
लॉकडाऊनमुळे व्यवसाय बुडणार, तर नागरिक म्हणतात सुट्टीच्या दिवशीही घरातच बसावे लागणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे आधीच व्यवसायावर परिणाम झाला आहे. शनिवारी-रविवारी व्यवसाय होतो. मात्र, आता शासनाने शनिवारी-रविवारी लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे व्यवसायावर परिणाम होणार आहे. त्यामुळे शासनाने कडक निर्बंध लागू करावेत; मात्र, शनिवार-रविवार लॉकडाऊन नकोच, असा सूर नागरिकांनी व्यक्त केला.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन राज्यात पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिले. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक यांनी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यात शुक्रवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळी आठपर्यंत लॉकडाऊन राहणार असल्याचे सांगितले. यात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून, उर्वरित सर्व बंद राहणार असल्याचे जाहीर केले. शासनाच्या या निर्णयाबद्दल ‘लोकमत’ने रविवारी सायंकाळी व्यापारी, विक्रेते, सर्वसामान्य नागरिक व महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
वीकएंडचा लाॅकडाऊन नकोच
शनिवारी व रविवारीच खरा धंदा असतो; कारण, इतर दिवशी नोकरदार व मजूर वर्गाला सुट्टी नसल्याने व्यवसाय होत नाही. त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या शनिवार व रविवारच्या लॉकडाऊनला आमचा विरोध आहे.
- टी. एच. ललवाणी, व्यापारी
रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने नोकरदार वर्ग घराबाहेर खरेदीसाठी निघतो. त्यामुळे या दिवशी व्यवसाय चांगला होतो. मात्र, शासनाने सुट्टीच्या दिवशीच लॉकडाऊन केल्यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. शासनाने लॉकडाऊनऐवजी कडक निर्बंध लागू करावेत.
- सचिन जोशी, व्यापारी
शासनाने इतर दिवशी लॉकडाऊन करावा. मात्र, शनिवार व रविवार नको. कारण, घरातील व बाहेरील कुठलीही कामे म्हटली तर या सुटीच्या दिवशीच करावी लागतात. त्यामुळे या दिवशी लॉकडाऊन नको.
- यश ललवाणी, नागरिक
या दोन साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीच घराबाहेर जाता येते. बाजारात जाऊन खरेदी करता येते. कुटुंबाला बाहेर फिरायला घेऊन जाता येते; त्यामुळे घरातही आनंद असतो. मात्र, शासनाने या दिवशी लॉकडाऊन करून आमचा आनंद हिरावून घेतला आहे.
- शिवम राजपूत, नागरिक
मोठ्या व्यावसायिकाप्रमाणे लहान विक्रेत्यांचाही शनिवारी व रविवारीच व्यवसाय होतो. इतर दिवशी फारसा व्यवसाय होत नाही. त्यामुळे शासनाने सर्वसामान्य लहान व्यावसायिकांचा विचार करायला हवा.
- लाला भावसार, विक्रेता
या दोनदिवसीय लॉकडाऊनचा लहान विक्रेत्यांवर मोठा परिणाम होणार आहे. ज्या दिवशी व्यवसाय असतो, त्याच दिवशी शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे लहान व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे शासनाने लॉकडाऊनऐवजी कठोर निर्बंध लागू करावेत.
- सुरेश पाटील, विक्रेता