जळगाव : गेल्या महिनाभरापासून पाठ फिरवलेल्या पावसाचे बुधवारी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार ‘कमबॅक’ झाले. बुधवारी रात्री व गुरुवारी पहाटेपर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पावसाने हजेरी लावली. अमळनेर व चाळीसगाव तालुक्यात तब्बल महिन्याभरानंतर वरुणराजा बरसल्याने, पावसाअभावी जीव तोडत असलेल्या खरीपच्या पिकांना नवसंजीवनी या पावसामुळे मिळाली आहे.
दरम्यान, आगामी चार ते पाच दिवस जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. बुधवारी जिल्ह्यात एकूण १२ मिमी पाऊस झाला आहे. त्यात सर्वाधिक ३१ मिमी पाऊस जामनेर तालुक्यात, तर त्या खालोखाल मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात २५ मिमी पाऊस झाला आहे. चाळीसगाव व अमळनेर तालुक्यातील जवळ-जवळ सर्वच महसूल मंडळांमध्ये गेल्या महिनाभरापासून पाऊस झाला नव्हता. त्यात काही महसूल मंडळांमध्ये तर ४० दिवसांपासून पाऊस नव्हता. मात्र, बुधवारी या दोन्ही तालुक्यांमधील सर्वच महसूल मंडळांमध्ये पाऊस झाल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. चाळीसगाव तालुक्यात १३ मिमी तर अमळनेर तालुक्यात ६ मिमी पावसाची नोंद झाली.
कोणत्या पिकांना काय फायदा...
- - सद्य:स्थितीत कापसाला कैऱ्या लागल्या आहेत. मात्र, पाण्याअभावी कैऱ्यांची वाढ थांबली होती. आता पावसामुळे कैऱ्या भरण्यास मदत मिळणार आहे.
- - सोयाबीनचे दाणे तयार होण्याच्या स्थितीत आहे. पावसामुळे सोयाबीनचे दाणे मोठे व होण्यास मदत मिळेल.
- - पाऊस नसल्याने तापमानात वाढ झाल्यामुळे केळीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला होता. पावसामुळे तापमानात घट होऊन, लाल्याचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता आहे.
- - कोरडवाहू जमिनीवरील उडीद, ज्वारी, मका या पिकांना पावसामुळे फायदा मिळणार आहे.