जळगाव : पत्नीसह दुचाकीने जाणाऱ्या वृद्धाला बसने जोरदार धडक दिली. या अपघातात वृद्ध जागीच ठार झाला तर महिला गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता साकेगाव महामार्गावर वाघूर नदीच्या पुलावर घडली.
कुतुबुद्दीन शेख अजमुद्दीन शेख (७०,रा.आसोदा, ता.जळगाव) हे पत्नी बदरुनिसा कुदबुद्दीन शेख (६५) यांच्यासोबत भुसावळ येथील लग्न समारंभ आटोपून दुचाकीने (एम.एच.१९-एएम ०६८७) येत असताना कल्याण- न्हावी बसने (एमएच २०-बीएल-२७३९) दुचाकीला धडक देत फरफटत नेले. या घटनेत शेख हे जागीच ठार झाले. बदरुननिसा या गंभीर जखमी झाल्या. त्यांना जवळच्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. अपघात घडताच चालक सचिन गोसावी हा घटनास्थळावरून फरार झाला.
हद्दीवरून संभ्रम; नागरिकांचा संताप
अपघात वाघूर नदीच्या पुलावर घडला. या पुलाच्या अर्ध्या बाजूला भुसावळ तालुका तर अर्ध्या बाजुला नशिराबाद पोलिसांची हद्द आहे. दोन्ही पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र हद्द कुणाची याच्यावरून पोलिसांमध्ये संभ्रम दिसत होता. अपघातानंतर मृतदेह रस्त्यावर पडला होता. नागरिक मृतदेह उचलण्यासाठी पोलिसांना विनवण्या करत होते. मात्र हद्दीचाच विषय सुरू असल्याने नागरिक संतप्त झाले. यावेळी पुलावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
१०८ आली उशिराने
अपघात घडताच साकेगावचे तरुण घटनास्थळी पोहोचले. जखमी महिला जागेवरच विव्हळत होती. त्यांना लगेच मदत मिळावी याकरिता ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेसाठी १०८ क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णवाहिका तब्बल एक ते दीड तासानंतर घटनास्थळी आली.
जीव मुठीत घेऊन प्रवास
महामार्गावर अपघात झाल्यानंतर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पुलावर पायी ये-जा करणाऱ्यांसाठी महामार्ग व नदीच्या बाजूने असलेला छोटा मार्ग बनविला आहे. या ठिकाणाहून दुचाकीस्वारांनी जीव मुठीत घेऊन वाहतूक केली.
पुलाच्या मध्यभागी हद्दीचे फलक लावावे
साकेगाव वाघूर नदीचा पूल असो की, तापी नदीचा पूल असो, अर्धा पूल वेगळ्या पोलिस हद्दीत तर अर्धापूल वेगळ्या पोलिस हद्दीत येतो. यामुळे पोलिस प्रशासनाचे हद्दीवरून नेहमीच वाद होतात. ही कायमची डोकेदुखी मिटावी याकरिता पुलाच्या मध्यभागी कठड्याच्या बाजूला हद्दीचे बोर्ड लावावे, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.