प्रशांत भदाणे
जळगाव - भाजप नेते गिरीश महाजन यांना आपल्या होमपीचवर पुन्हा एक जबर धक्का बसलाय. जळगाव महापालिकेत शिवसेनेनं भाजपचे ४ नगरसेवक आपल्या गळाला लावले आहेत. त्यामुळं शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं वजन वाढलंय. आता महापालिकेत शिवसेनेचे स्पष्ट बहुमत झालंय.
'या' नगरसेवकांनी हाती बांधलं शिवबंधन
भाजपच्या ४ नगरसेवकांनी आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावी हाती शिवबंधन बांधलं. त्यात प्रवीण कोल्हे, प्रिया जोहरे, मीनाक्षी पाटील, मीना सपकाळे यांचा समावेश आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला.
सभागृह नेते ललित कोल्हे ठरले हिरो!
भाजपच्या चारही नगरसेवकांना शिवसेनेत दाखल करून घेण्याचा प्रक्रियेत सभागृहनेते ललित कोल्हे प्रमुख सूत्रधार ठरले. त्यांनीच नगरसेवकांच्या प्रवेशाची आखणी केली होती. शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनीही या कामी पक्षीय स्तरावर सूत्रे सांभाळली. दरम्यान, शहरातील विकास कामांबाबत भाजपच्या नगरसेवकांची स्थानिक नेतृत्वावर तीव्र नाराजी होती. त्यामुळं हे नगरसेवक शिवसेनेत दाखल झालेत, त्यांना विकासकामांचं आश्वासन दिलंय. या साऱ्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार झालेला नाही, अशी प्रतिक्रिया ललित कोल्हे व सुनील महाजन यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
अजून काही नगरसेवक संपर्कात?
भाजपचे अजून काही नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा यावेळी सुनील महाजन आणि ललित कोल्हे यांनी केलाय. पण हा दावा करताना त्यांनी संपर्कात असणाऱ्या नगरसेवकांची नावे सांगणं टाळलं.
असं आहे पक्षीय बलाबल-
शिवसेना- 40 (पाठींब्यासह बहुमत)
शिवसेना- 15
बंडखोर भाजप- 22
एमआयएम- 3
भाजप- 35