अमित महाबळ, जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा राज्य पातळीवरील प्रतिष्ठेचा ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी’ पुरस्कार यावर्षी महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला दिला जाणार असून, त्यासाठी ९ ऑगस्ट २०२४ पर्यंत विद्यापीठाने प्रस्ताव मागविले आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून विद्यापीठाच्या वतीने राज्यपातळीवर कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार दिला जातो. ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सामाजिक, कृषी, शिक्षण आणि साहित्य हे चार क्षेत्र पुरस्कारासाठी निश्चित करण्यात आले आहेत. यावर्षीचा राज्यस्तरीय पुरस्कार शिक्षण क्षेत्रासाठी दिला जाणार आहे.
शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणारी व्यक्ती अथवा संस्था, ज्यांनी मूल्याधिष्ठित शिक्षणासाठी प्रयत्न केले आहेत, तसेच नावीन्यपूर्ण शिक्षण प्रणाली विकसित केली आहे, त्यांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत. दि. ९ ऑगस्ट २०२४ पर्यंत कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कारासाठी अर्ज असे लिफाफ्यावर नमूद करून ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, पत्रपेटी क्र. ८०, जळगाव, जिल्हा जळगाव - ४२५ ००१’ या पत्त्यावर प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी केले आहे.
या आहेत अटी...
१) पुरस्कारासाठी व्यक्ती किंवा संस्था महाराष्ट्राच्या कोणत्याही भागातील असावी.
२) व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचे वय ४० वर्षांपेक्षा कमी नसावे आणि १५ वर्षांपेक्षा जास्त काळ त्या क्षेत्रात काम केलेले असावे.
३) संस्था असेल तर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. त्या संस्थेचे कार्यदेखील १५ वर्षांपेक्षा अधिक असावे.
४) तज्ज्ञ निवड समितीकडून प्राप्त प्रस्तावांची छाननी होऊन पुरस्कार जाहीर केले जाणार आहेत.
५) विशेष परिस्थितीत पुरस्कारासाठी प्राप्त प्रस्ताव व्यतिरिक्त इतर योग्य व्यक्ती अथवा संस्थेचादेखील विचार केला जाऊ शकतो.
६) पुरस्कारासाठीची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. त्यामध्ये विहित नमुन्यातील अर्ज, पात्रता, नियमावली देण्यात आली आहे.