जळगाव : घराचे कर्ज फेडण्यासाठी मुलीसोबत लग्न लावण्याचे आमिष दाखवित एक लाख २० हजार रुपये घेऊन मुलीला नांदविण्यासाठी पाठविले नाही, म्हणून चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काशीनाथ तुकाराम चाैधरी (६३, रा. शाहूनगर) यांनी फिर्याद दिली आहे. चौधरी यांचा मुलगा अक्षय याचा पूजा उर्फ पौर्णिमा सचिन इंगळे हिच्यासोबत लग्नाचा प्रस्ताव सुरू होता. मात्र तत्पूर्वी संशयित देवकाबाई उर्फ कविता सचिन इंगळे (रा. नांदुरा, जि. बुलढाणा) यांच्या घरावर असलेले कर्ज फेडण्यासाठी फिर्यादी यांच्याकडून एक लाख २० हजार रुपयांची रक्कम घेण्यात आली. त्यानंतर संशयित आरोपी रेखा पृथ्वीराज पाटील, पृथ्वीराज पाटील (दोन्ही रा. कुसुंबा), देवकाबाई उर्फ कविता सचिन इंगळे यांनी पूजा उर्फ पौर्णिमा सचिन इंगळे हिला विवाह नोंदणीसाठी पाठविले नाही.
नांदविण्यासाठी देखील पाठविले नाही. त्यानंतर फिर्यादी यांनी पैशांची मागणी केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर चौधरी यांनी शहर पोलिस स्टेशन गाठत चौघांविरुद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस अंमलदार धनराज निकुंभ हे करीत आहेत.