जळगाव : महानगरपालिकेने विशेष मोहीम राबवून विनापरवानगी जाहिरातीचे लावलेले ५५३ फलक( होर्डिंग्ज ) जप्त केले आहेत. आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या आदेशान्वये शाखा अभियंता व किरकोळ वसुली विभागातील कर्मचारी यांची सात पथक तयार करण्यात आली होती. या पथकाने महापालिकेकडे परवानगी घेतलेल्या फलकांची यादी हातात घेऊन शहरात मोहीम राबविली. पहिल्याच दिवशी ५५३ फलक काढण्यात आले. शहरामध्ये अनेक जणांनी विनापरवानगी जाहिरातीचे फलक( होर्डिंग्ज )लावल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार १ एप्रिलपासून फलक जप्तीची मोहीम राबवायला सुरुवात झाली. ज्या जाहिरात फलक, होर्डिंग्जधारकांनी मनपाची परवानगी घेतलेली आहे.परंतु फलक लावण्याची प्रत्यक्ष मागणी, मंजूर संख्या व या संख्येपेक्षा जास्त फलक लावल्याचे आढळून आल्यास असेही फलक जप्त करुन या लोकांवर महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ नुसार कारवाई केली जाणार आहे. कारवाई टाळण्यासाठी संबंधितांना असे फलक तात्काळ काढून घ्यावे, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.
जळगावात महापालिकेने ५५३ अनधिकृत फलक काढले
By सुनील पाटील | Published: April 01, 2023 6:45 PM