जळगाव : पिंप्राळ्यातील आनंदबन गृहनिर्माण हौसिंग सोसायटी व कॉलनी परिसरातील रहिवाशांच्या वहिवाटातील महापालिकेच्या मालकीची खुल्या भूखंडात अनधिकृतपणे बांधकाम करुन काही जणांनी रस्ता बंद केला आहे. या जागेची मोजणी करावी व संभाव्य वादाच्या घटना टाळाव्यात यासाठी रहिवाशांनी महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या, परंतु या तक्रारीची दखलच घेतली जात नसल्याने भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला महापालिका प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा रहिवाशांनी दिला आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांसोबतच, न्यायालय व लोकअदालतीतही तक्रार करण्यात आली आहे.
पिंप्राळ्यातील गट नंबर २००/४ पैकी प्लॉट नं ८ याला लागून महापालिकेची जागा असून १९८८ पासून लेआऊटनुसार ९ मीटरचा कायमचा वहिवाटाचा रस्ता आहे. या लगत महापालिकेच्या खुल्या जागेत काही जणांनी कोणतीही कायदेशीर मंजुरी न घेता व महसुली दस्ताऐवज नसताना अनधिकृतपणे कंपाऊडचे बांधकाम सुरु केले व खड्डे खोदून हा वहिवाटीचा रस्ता बंद केला. यामुळे रहिवाशांची गैरसोय होत आहे. हे बांधकाम थांबवून जागेची मोजणी करावी यासाठी रहिवाशांनी २९ जुलै २०२२ रोजी महापालिका आयुक्तांना लेखी तक्रार केली.
रस्ता बंद केल्यामुळे सातत्याने वादविवाद होत असून शांततेचा भंग होत आहे. भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती रहिवाशांना आहे. महापालिकेने बांधकाम बंद करुन हा प्रश्न निकाली काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. स्थानिक नगरसेवक व उपमहापौरांनाही याबाबत निवेदन देण्यात आले आहे.मात्र त्यांनीही दखल घेतली नाही. त्यामुळे रहिवाशांनी लोक अदालतीत तक्रार दाखल केली आहे तर विक्रम महाजन यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.