अमित महाबळ, जळगाव : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशाळांमध्ये सुरु झालेल्या पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांची माहिती व्हावी यासाठी शुक्रवारी (दि. २८), इयत्ता १२ वी आणि पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, त्यांचे पालक यांच्यासाठी विद्यापीठात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षाच्या वतीने सकाळी १० वाजता सिनेट सभागृहात होणाऱ्या या कार्यशाळेत कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्यासह या नवीन अभ्यासक्रमांची माहिती देणारे तज्ज्ञ प्राध्यापक संवाद साधणार आहेत. या संवादामुळे विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमांची माहिती तसेच करिअरच्या संधी याविषयी माहिती मिळेल आणि शंकाचे निरसन देखील होणार आहे. पाच पदवी अभ्यासक्रमांसाठी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी पदवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील. या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून, www.nmu.ac.in या संकेतस्थळावर माहिती देण्यात आलेली आहे.
प्रथमच थेट पालकांशी संवाद...
यंदा प्रथमच विद्यापीठाने विद्यार्थी आणि पालकांमध्ये अधिक जनजागृती व्हावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. तरी प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी कार्यशाळेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन अंतर्गत गुणवत्ता निर्धार कक्षाचे संचालक प्रा. समीर नारखेडे यांनी केले आहे.
एनईपीअंतर्गत नवीन अभ्यासक्रम...
१) नवीन शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत व्यवस्थापन शास्त्र प्रशाळेत बी.कॉम. (बीएफएसआय), भौतिकशास्त्र प्रशाळेत बी.एस्सी. (इलेक्ट्रॉनिक्स) हे दोन नाविन्यपूर्ण चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम सुरु होणार आहेत. सेंटर फॉर रिसर्च इन स्कीम्स ॲण्ड पॉलिसी व महाराष्ट्र शासन यांच्यात झालेल्या सामंजस्य करारांतर्गत सुरु होणाऱ्या या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांना शिकाऊ प्रशिक्षणाची (ॲप्रेंटिसशिप) संधी मिळणार आहे.
२) याशिवाय विद्यापीठाने गतवर्षी नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत संगणकशास्त्र प्रशाळेत बी.एस्सी. (कॉम्प्यूटर सायन्स), गणित शास्त्र प्रशाळेत बी.एस्सी. (मॅथेमेटीकल सायन्स) आणि सामाजिक शास्त्र प्रशाळेत बी.ए. (सोशल सायन्स) हे चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
३) या पाच अभ्यासक्रमांची तसेच विद्यापीठाच्या विविध प्रशाळांमध्ये असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची माहिती आणि ओळख या कार्यशाळेत करून दिली जाणार आहे.