जळगाव - आपण मंजूर करुन आणलेल्या २१७ कोटी रुपयांच्या कामांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करुन स्थगिती मिळविली आहे. हा एक प्रकारचा जातीयवाद आणि करंटेपणा आहे, अशा जोरदार शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.
शुक्रवारी सायंकाळी मुक्ताईनगर येथील फार्महाऊसवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, आमदारांनी विशेषतः माझी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आपण २१७ कोटी रुपयांची कामे मतदारसंघात मंजूर करून आणली आहेत. यातील काही कामे मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील आहेत. काही कामे मंज़ूर तर काही प्रस्तावित आहेत.
आमदार पाटील हे आपण शिवसेनेचे आमदार आहोत, असे जाहीर सांगत असतात. त्यांनी विधान मंडळांमध्ये किंवा जिल्हाधिकार्यांकडे साध्या दोन ओळीचे पत्र लिहून मी शिवसेनेचा आमदार आहे, असे सांगावे. स्पर्धा विकासाची करा, आपण २०० कोटी आणले तुम्ही ५०० कोटी आणून दाखवा. मंजूर कामांना स्थगिती आणायचा करंटेपणा करू नका. या मतदारसंघात अधिकारी यायला तयार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण पाच पूल करून दाखवले आमदार पाटील यांनी किमान शेमळदा येथे तापी नदीवरील आश्वासन दिलेला एक पूल करून दाखवावा, आव्हानही खडसे यांनी आमदारांना दिले आहे. ही तर खडसेंची धूळफेक केवळ पाच कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती मिळाली आहे. २१७ कोटी रुपयांच्या कामांना स्थगितीचा आरोप म्हणजे खडसे यांची निव्वळ धूळफेक आहे. ग्रामविकास मंत्रालयाकडून मंजूर झालेला निधी नगरपंचायत हद्दीत खर्च करणार कसा? तोच निधी परत गेला आहे. त्यामुळे जातीयवादीपणाचा आरोप धादांत खोटा आहे. तुमच्याप्रमाणेच आपणही महाविकास आघाडीचा घटक आहोत. त्यामुळे खडसे यांनी महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकू नये.- आमदार चंद्रकांत पाटील