चाळीसगाव जि. जळगाव : स्मार्ट व्हिजन मल्टिरियल सोलुशन प्रा. लि. नागपूर या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक केलेली रक्कम सहा महिन्यांतच दामदुप्पट करून देतो, असे आमिष दाखवून शेतकऱ्याची ४० लाखात फसवणूक केली. याबाबत कंपनीचा संचालक संजय विठोबा उमाटे (रा.नागपूर) याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सहा महिन्यात दामदुप्पट रक्कमेचे आमीष दाखविल्याने पुंडलीक दौलत पाटील (रा. उंबरखेड ता. चाळीसगाव) यांनी ६ ऑक्टोबर २०१० मध्ये वरील कंपनीच्या नावाने असलेल्या बँक खात्यात दोन हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन भरली. त्यानंतर टप्याटप्याने त्यांनी बँकेत ४० लाख रुपयांची रक्कम गुंतवणूक केली.
त्यानंतर पाटील यांनी नागपूर येथील कंपनीच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली. गुंतवणूकीच्या रकमेला सहा महिने झाल्यानंतर पाटील यांनी पैशाची मागणी केली असता संजय उमाटे याने उलट उत्तरे देऊन पैसे देण्यास टाळाटाळ केली. उमाटे हा नागपूर येथील कंपनीचे कार्यालय व मोबाईल फोन बंद करून पळून गेल्याची खात्री झाल्यावर पुंडलीक पाटील यांनी याबाबत धंतोली पोलीस स्टेशन नागपूर व पोलीस अधिक्षक जळगाव यांच्या कार्यालयात ऑनलाईनने तक्रार केली होती.
गुंतवणूक केलेली रक्कम आजपावेतो परत न मिळाल्याने अखेर पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांत उमाटेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.