जळगाव : जिल्ह्यातील पशुधनामध्ये सलग दुसऱ्या वर्षी लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव झाला असून, त्याला आवर घालण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र, रिक्त पदांमुळे यामध्ये खो बसत आहे. जिल्ह्यात पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक यांची १०३ पदे रिक्त आहेत.
जिल्ह्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लम्पीचा शिरकाव झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने रावेर व यावल तालुक्यात तातडीने लसीकरण केले. मनुष्यबळ कमी पडू नये म्हणून मुक्ताईनगर व भुसावळ या दोन तालुक्यांची पथके मदतीला देण्यात आली होती. मात्र यानंतरही लम्पीचा फैलाव थांबला नाही. प्रशासन प्रयत्न करत असताना सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यातील रिक्त पदांचा परिणाम या मोहिमेवर झाला. तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने पशुधनमालक खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी वळले.
८ लाखांवर पशुधन
गेल्या वर्षीही लम्पी आला होता. त्यानंतरही रिक्त पदे भरली गेली नाहीत. २०१९-२० मधील २० व्या पशुगणनेनुसार, जळगाव जिल्ह्यात गाय व म्हैस वर्गाची पशुधनाची संख्या ८ लाख ४६ हजार ४०७ आहे. यामध्ये ५ लाख ७७ हजार ३०२ गाय वर्गाची संख्या आहे. दर दहा वर्षांनी पशुगणना केली जाते. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखाने उभारण्यात आले आहेत.
सरकार केव्हा भरणार पदे
जिल्ह्यात १५२ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. श्रेणी एकमधील ८९ आणि श्रेणी दोनमधील ६३ दवाखाने आहेत. या ठिकाणी पशुधन विकास अधिकाऱ्यांची ४८, सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांची १३, पशुधन पर्यवेक्षक यांची ४२ पदे रिक्त आहेत. पशुधन विकास अधिकारी राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून नियुक्त केले जातात.
डॉक्टरांवर ताण
प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्याला एकापेक्षा अधिक गावे जोडलेली आहेत. परंतु, रिक्त पदांमुळे एकाच डॉक्टरांवर दोन-दोन ठिकाणचा कार्यभार आहेत. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे पशुधनमालकांना खासगी दवाखान्यात जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. खासगी दवाखान्यात किती पशुधनांवर उपचार सुरू आहे याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नव्हती. खासगी डॉक्टरांनीही दिली नाही. याचाही परिणाम ही साथ वाढण्यात झाला आहे. यावरुन टीका झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने खासगी पशु रुग्णालये, पशुवैद्यक यांच्याकडील आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
का आहे भीती?
लम्पी स्किन गाई, म्हशींमध्ये आढळून येतो. या रोगामुळे त्वचा खराब होते. अंगावर गाठी येणे, फोड येणे व त्यानंतर जखम होणे अशी आजाराची लक्षणे दिसून येतात. या रोगामुळे मृत्यू होत नसला, तरी बाधित जनावरे अशक्त होतात आणि दूध उत्पादनात घट होते. काहीवेळा बाधित जनावरांचा गर्भपात होतो, प्रजनन क्षमता घटते. या रोगाचा प्रसार निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने तसेच चावणाऱ्या माशा, डास, गोचीड, चिलटे यांच्यामुळे होतो.