सुनील पाटील -
जळगाव : अंगात श्रीमंती अन् मस्ती होती म्हणून ते गाड्यांची रेस खेळत होते, पण त्यांच्या या खेळात पत्नी, दोन मुलं व भाचा असे चार जीव गेले. खेळ परत खेळता येईल; पण गेलेले जीव परत येतील का? दहा वर्षांचा असताना आई, वडिलांचा मृत्यू झाला. मोठ्या भावाने सांभाळ करून माझं लग्न लावून दिलं. पत्नी, दोन गोंडस मुलांसोबत संसार सुरू असताना त्यालाही दृष्ट लागली. क्षणातच पत्नी, मुलांना हिरावून घेतलं. लाडका भाचा सुट्ट्यांमध्ये आला. त्याचेही प्रेतच घरी गेलं... ही दुर्दैवी कहाणी आहे सरदार हिरालाल चव्हाण (वय २८, रा. लोंढ्री, ता. जामनेर ह. मु. रामदेववाडी, ता. जळगाव) या तरुणाची.
जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे ७ मे रोजी भरधाव कारच्या धडकेत वच्छला सरदार चव्हाण (२७), मुलगा सोहम (८), सोमेश (२, सर्व रा. लोंढ्री, ता. जामनेर ह. मु. रामदेववाडी, ता.जळगाव) व भाचा लक्ष्मण नाईक (वय १७, जामनेर) हे चार जण ठार झाल्याची घटना घडली होती. दोन दिवसांपूर्वी पुण्यामध्येही अशाच प्रकारच्या एका घटनेची पुनरावृत्ती झाली. या दोन्ही घटनांनी महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. रामदेववाडी येथील घटनेला १५ दिवस उलटले तरी संशयित आरोपींना पोलिसांनी अजून अटक केलेली नाही. आठ दिवसांत आरोपींना अटक केली नाही तर थेट एमआयडीसी पोलिस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. त्याचे नियोजन सुरू झाल्याचे चव्हाण म्हणाले.
जीवन जगण्याला अर्थच नाही- दहा वर्षांचा असताना आई यशोदा हिचे निधन झाले. त्यापाठोपाठ वडिलांचा मृत्यू झाला. बालपणातच मातृपितृ छत्र हरपले. मोठा भाऊ अनिल चव्हाण याने बहीण कविता, ललिता आणि माझा सांभाळ केला. लग्नाच्या आधीच शिरसोली येथे आलो. - डॉ.सोपान पाटील यांनी आधार दिला. त्यांच्याकडेच काम करू लागलो. २३ मे २०१६ रोजी वच्छला हिच्याशी लग्न झाले. संसार सुखाने बहरत गेला. सोहन आणि सोमेश ही दोन गोंडस मुले जन्माला आली. आता संसारात कसलीच कमी नव्हती. - अशातच ७ मे २०२४ हा काळा दिवस उजाडला. पत्नी रामदेववाडी येथे आशा सेविकेची ड्युटी करून शिरसोली येथे जात असताना दुपारी ४:४५ वाजता श्रीमंतीची मस्ती असलेल्या बड्यांच्या मुलांनी माझं अख्खं कुटुंबच चिरडून टाकलं... या घटनेमुळे जगण्याचा अर्थ हरवला. एकही क्षण नाही की पत्नी, मुलं व भाचा डोळ्यांसमोर दिसत नाही.. हे सांगत असताना सरदारचे डोळे पाणावले होते.
यात नेमके दोषी कोण? - या घटनेत बेदरकारपणे वाहन चालवणारा मुलगा दोषी तर आहेच, पण मुख्य जबाबदार आहेत ते पालक, ज्यांनी वाहन देऊन मौजमस्ती करायला परवानगी दिली. बड्यांच्या मुलांना संरक्षण देणारे लोकप्रतिनिधी. - पोलिस कोणावर अन् काय कारवाई करतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.
पोलिस पाटलाचीही भूमिका संशयास्पदअपघात घडला तेव्हा पोलिस पाटील व काही नागरिक या प्रकरणातील आरोपींच्या बचावासाठी प्रयत्न करीत होते. आमच्यावर दु:खाचा प्रसंग असताना अशा परिस्थितीत पोलिस पाटलाकडून दगडफेक करण्यात आली. पोलिस पाटलाची भूमिका संशयास्पद असून, त्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे. आक्रोश मोर्चात आमची हीदेखील प्रमुख मागणी असणार आहे. आम्ही दु:खात असताना अनेक जण राजकारण करीत राहिले हे दुर्दैव असल्याची भावना या कुटुंबीयांनी व्यक्त केली.
मग दारूचीही फॉरेन्सिक तपासणी करणार का? या घटनेत गांजा आढळूनही सुरुवातीला फिर्यादीत त्याचा उल्लेख केला नाही. नंतर कलम लावण्यात आले. तरीदेखील तो गांजाच आहे की अन्य कोणता पदार्थ यासाठी फॉरेन्सिक लॅबकडून त्याची तपासणी करणार असल्याचे पोलिसांनी आम्हाला सांगितले. आमच्या घरात दारूच्या बाटल्या सापडल्या तर ही दारू आहे की पाणी, त्याचीही अशीच तपासणी करणार का? असा सवाल सरदारच्या नातेवाइकांनी केला.
पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना प्रश्नअपघात प्रकरणात संशयित आरोपी निष्पन्न झाले का? आव्हाड : दोन संशयित आरोपी निष्पन्न झाले. ते उपचार घेत आहेत.पोलिस राजकीय दबावात संशयित आरोपींना वाचवत आहेत का? आव्हाड : अजिबात नाही. कायद्यात जे आहे, तेच आम्ही करीत आहोत. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही.गाडीत दोघं जण होते तर मग चालक अज्ञात कसा व हे दोघे शेजारी कसे? आव्हाड : असं काही नाही. गाडीत असलेल्या दोघांनाच आरोपी केले.आरोपींना अटक का नाही होत? आव्हाड : दोन्ही संशयित आरोपी दवाखान्यात उपचार घेत आहेत. डिस्चार्जनंतर अटकेची कारवाई करू. आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.आव्हाड : हा अपघात आहे, खून नाही. कोणी राजकारण करत असेल तर त्यांच्यासाठी रुग्णालयातून उचलून आणून अटक नाही करू शकत.