जळगाव : पाणीपुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यातच पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, २६ गावांमध्ये २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा मतदार संघ असलेल्या धरणगाव शहरात तब्बल १० ते १२ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरात तीन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.
पावसाअभावी जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा जिल्हा असला, तरी टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी नाही. दि.१२ जून अखेर २६ गावांमध्ये २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. ही संख्या वाढत आहे. सात दिवस आधी २५ गावात २८ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. त्यामध्ये प्रत्येकी एकने वाढ झाली आहे. प्रशासनाने गावांसाठी ६३ आणि टँकरसाठी १० विहिरींचे अधिग्रहण केले आहे. पाऊस लांबल्यास मोठी समस्या उभी राहू शकते. त्याला तोंड देण्यासाठी प्रशासनाने ऑगस्ट २०२३ पर्यंतचा संभाव्य विशेष कृती आराखडा तयार करून ठेवला आहे.
पाण्याअभावी त्या-त्या गावातील रहिवाशांचे हाल होत आहेत. मोठ्या शहरांमध्ये परिस्थिती वेगळी नाही. काही ठिकाणी प्रकल्पातील जलसाठा कमी आहे, तर कुठे पाणी असूनही नियोजनाअभावी अथवा सदोष पाणीपुरवठा योजनांमुळे नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा होत नाही. वाघूर धरणात पुरेसा जलसाठा असला तरी अमृत योजनेचे काम पूर्ण न झाल्यामुळे जळगाव महापालिका क्षेत्रात तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. भुसावळ शहरात ९ दिवसांआड, अमळनेर नपा क्षेत्रात चार दिवसाआड, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरात तीन दिवसाआड, धरणगाव नपा क्षेत्रात १० ते १२ दिवसाआड पाणी, चाळीसगाव न.पा मध्ये ५ दिवसांआड, तर एरंडोल न.पा क्षेत्रात ४ ते ५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. अंजनी धरणात केवळ २० टक्के जलसाठा आहे.
टँकरने पाणीपुरवठा होत असलेली गावे
तालुका - गावांची संख्या - टँकर
जळगाव - १ - १जामनेर - ६ - ६भुसावळ - २- २बोदवड - १ - १पारोळा - २- २पाचोरा - ३ - ५चाळीसगाव - ९ - १०भडगाव - २- २
टँकर लावण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना प्रदानअल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबणार असल्याचा अंदाज आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जुलै व ऑगस्ट महिन्याचा टंचाई आराखडा तयार केला असून, त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. टँकर लावण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे.