ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.23 - सफाईबाबत दर सभेत ओरड होऊनही आरोग्याधिकारी केवळ सुधारणा करू, बघू अशी उत्तरे देत असल्याने मनसेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी शुक्रवार, दि.23 रोजी स्थायी समितीच्या सभेत भरसभागृहातच आरोग्याधिकारी डॉ.विकास पाटील यांना लोटांगण घातले. काहीही उद्योग करा, मात्र त्यासोबत साफसफाई देखील करा, असा इशाराच त्यांनी दिला.
मनपाचे दरमहा कोटय़वधी रूपये सफाईच्या कामावर खर्च होत असताना शहरात अपेक्षित सफाई होताना दिसत नाही. बाहेरची संस्था येऊन सफाईबाबत सूचना देते. त्यामुळे आरोग्याधिकारी व कर्मचा:यांच्या कार्यक्षमतेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी काय उद्योग करतात ते सगळ्यांना माहित आहे. काहीही उद्योग करा, मात्र त्यासोबत साफसफाई देखील करा, अशी मागणी नगरसेवक अनंत जोशी यांनी स्थायी समितीच्या सभेत केली.
15 प्रभागात 480 कर्मचारी, तरीही अस्वच्छता
जोशीे म्हणाले की, मनपाने 22 प्रभागात सफाईचा ठेका दिला आहे. त्यावर महिन्याला 67 लाख रूपये खर्च होत आहे. त्यातही सफाई होत नसल्याने दंडात्मक कारवाई केली जाते. ते योग्यही आहे. मात्र मनपा आस्थापनेवर 480 सफाई कामगार आहेत. ते उर्वरीत 15 प्रभागांमध्ये सफाई करतात. तरीही या प्रभागांमध्ये अस्वच्छता दिसून येते. जळगाव फस्र्ट चांगले काम करीत आहे. या सारख्या संस्था सव्रेक्षण करून आरोग्य विभागाला सूचना करतात. मग आरोग्य विभागात काम करणारे आरोग्याधिकारी, कर्मचारी काय करतात? पगार घेऊनही त्यांना काम करता येत नाही का? बाहेरच्या संस्थेवर सव्रेक्षण करून सूचना करण्याची वेळ येते. हे तुमच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह नाही का? असा सवाल केला.