रावेर - दैनंदिन जीवनात अत्यावश्यक असलेल्या दूध, तूप व खाद्यतेलापासून बहुतांशी खाद्यपदार्थांमध्ये बिनबोभाटपणे ठोक विक्रेते व त्यात आणखी किरकोळ विक्रेते वाढत्या नफेखोरीसाठी भेसळ करून सर्रास विक्री करीत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे थेट कंपनी पॅकिंगच्या वस्तू घेऊ शकत नसल्याने ग्रामीण जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. तालूक्यात कर्करोगाने पाय पसरवले असल्याने मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलसह अन्य शासकीय, धर्मदायी, कार्पोरेट व खासगी रूग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची चिंताजनक बाब गंभीर ठरली असून, अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाच्या निगरगठ्ठ प्रशासनाबाबत जनसामान्यांमधून कमालीचा संताप व्यक्त होत आहे.रावेर तालुक्याला केळीच्या समृध्दीचे वेसण असले तरी, त्यावर पोसल्या जाणाऱ्या अन्न व औषधीसंबंधीत धंदे व्यावसायिकांचा राजरोसपणे सुरू असलेला भेसळीचा स्वैराचार बिनधोक असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. गत १५ ते २० वर्षांच्या या कालखंडात अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाने आजपर्यंत कोणतीही धडक कारवाई या तालुक्यात केली नसल्याची आजपर्यंतची परिस्थिती असल्याने तालूक्यात खरोखरचं अन्न व औषधीचा गुणात्मक दर्जा वस्तुतः टिकवण्यात येतो काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाची एकही धडक कारवाई वर्षाकाठी होत नाही ? इतकं ऑल इज वेल असल्याची परिस्थिती मात्र तालुक्यात नसल्याची वास्तविकता असल्याने, जनसामान्यांचे जीविताशी खेळ खेळणाऱ्या या अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाच्या नाकर्तेपणाबाबत कमालीचा संताप व्यक्त होत आहे.तालुका हा मध्य प्रदेश सीमेवरील तालूका असल्याने ग्रामीण भागातील किरकोळ विक्रेत्यांकडे भेसळयुक्त किराणा व भुसार मालाची सर्रास विक्री होत असल्याची चर्चा आहे. सकाळी होणाऱ्या दुधाचा फॅट वाढवण्यासाठी किरकोळ विक्रीतून ते खाद्य तेल, तुप, वा अन्नधान्यात सर्रास भेसळ केली जात असल्याची विदारक परिस्थिती आहे. तथापि वांगी, दोडकी, गिलकी व भाजीपाल्यावर बेगडी गुणवत्तेसाठी होणारे घातक रासायनिक प्रयोगांमुळे ग्रामीण जनतेच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे.अन्नभेसळ व बेगडी गुणवत्तेसाठी केल्या जाणाऱ्या रासायनिक प्रयोगांमुळे ग्रामीण भागात कर्करोगाने पाय पसारले असून मुंबई, पुणे, औरंगाबाद व इंदूर येथे कर्करोगावरील उपचारासाठी जाणाऱ्या रूग्णांचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याची चिंताजनक बाब समाजस्वास्थ्य बिघडवणारी ठरली आहे. जनसामान्यांचे आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या या गंभीर विषयाकडे पाहतांना अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभाग जर गांधारी पट्टी डोळ्यावर चढवत असेल तर या जनसामान्यांचे आरोग्याची रक्षण तरी कोण करेल? असा खडा सवाल उपस्थित केला जात आहे.स्थानिक स्वराज्य संस्था असो वा आमदार - खासदार असोत लोकप्रतिनिधींना केवळ लाभाच्या योजनांकडे लक्ष देण्यास सवड मिळत असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. तथापि जनसामान्यांचे जिवीताशी खेळ खेळणार्या संबंधित दोषींविरुद्ध कारवाई करण्याबाबत हेतुतः दुर्लक्ष करणाऱ्या व कारवायांमध्ये अनियमितता असलेल्या अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाची झोप उघडण्यासाठी लोकप्रतिनिधींना सोयरसुतक नसल्याने कमालीचा संताप व्यक्त होत आहे.
निगरगठ्ठ अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागामुळे ग्रामीण जनतेचं आरोग्य धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 10:16 AM