जळगाव : तापी नदी पात्रातील नांदेड येथील व खान्देशातील पहिल्या शासकीय वाळू डेपोचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते शुक्रवारी उदघाटन करण्यात आले. यावेळी तीन घरकुलधारकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मोफत रेतीचे वाटप करुन त्यांचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा खनिकर्म अधिकारी रवींद्र उगले, प्रांताधिकारी मनिषकुमार गायकवाड, तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी, नायब तहसीलदार सातपुते, गटनेते पप्पू भावे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
घरकुल धारकांना मोफत वाळू
शासनाच्या धोरणानुसार दलित, आदिवासी यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार घरकुल दिले जाते. रमाई घरकूल, शबरी घरकुल व अन्य घरकूल योजनांद्वारे घरांची बांधकामे करण्यासाठी पुरेशा प्रमाणात वाळुची उपलब्धता आहे किंवा नाही यासंदर्भात गावनिहाय वाळू उपलब्धतेचे नियोजन आता तहसीलदारांनी करावे असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
अशी असणार वाळू उपलब्धता
नांदेड येथील गट नंबर १११९ मध्ये वाळू गट क्र. १२ व १३ साठी ५२४७ ब्रास वाळूसाठा उपलब्ध आहे. आता जिल्ह्यात २९ वाळू गटांसाठी २२ वाळू डेपो स्थापन होणार असून या वाळू डेपोमधून एकूण १ लक्ष ०६ हजार ७९७ ब्रास वाळू उपलब्ध होणार आहे. ही वाळू विकताना ग्राहकांसाठी ‘ना नफा - ना तोटा’ या तत्वाचा अवलंब होणार आहे.वाळूची नोंदणी केल्यावर १५ दिवसांच्या आत वाळू डेपो मधून वाळू घेऊन जाणे बंधनकारक असणार आहे.
सूत्रसंचालन आर. डी. महाजन यांनी केले तर आभार तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी मानले.
घरकुलधारकांना रेती वाटप
तालुक्यातील अनिता सैदाणे, अनिता बावस्कर यांचा साळी चोळी व बुके देवून तसेच व दिलीप केदार यांचा रुमाल व टोपी देवून पालकमंत्री गुलाबराव पाटील, कमिशनर राधाकृष्ण गमे व आयुष प्रसाद यांच्या हस्ते सत्कार केला व या घराकुल धारकांनाप्रत्येकी ५ ब्रॉस रेतीचे वाटप करण्यात आले.