रस्त्याचे सौंदर्य हिरवळीने बहरणार
भडगाव : तालुक्यातील गोंडगाव ते वाडे रस्त्याच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण विभागामार्फत लिंब, जांभूळ, करंज आदी वृक्षांच्या लागवडीचा शुभारंभ झाला आहे. यावेळी गोंडगाव ते वाडे रस्त्यावर गोंडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने शिवाजी पाटील, वाडे वाचनालयाचे संचालक अशोक परदेशी, वाडे ते गोंडगाव रस्त्यावर वाडे येथील सरपंच रजूबाई पाटील यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले.
या संपूर्ण रस्त्याच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण विभागामार्फत विविध चार हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. वृक्षलागवडीचे काम सुरू आहे. या वृक्षांचे संगोपनकामी शेतकरी व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागामार्फत करण्यात येत आहे.
याबाबत माहिती अशी की, गोंडगाव ते वाडे रस्त्याच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षलागवडीचे काम जोमात सुरू झाले आहे. लिंब, जांभूळ, करंज यासह एकूण चार हजार रोपांची लागवड करण्याचे काम सुरू झाले आहे. या वृक्षलागवडीमुळे येणाऱ्या काळात रस्त्याच्या सौंदर्यात भर पडून निसर्गरम्य वातावरण तयार होण्यास मदत होईल. शेतकरी व नागरिकांनीही वृक्षांचे संगोपन वा जतन करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन गोंडगाव, बांबरूड प्र ब., वाडे, नावरे आदी परिसरातील वृक्षप्रेमींनी केले आहे. गोंडगाव ते बांबरुड प्र. ब., वाडे रस्त्यावर ग्रामपंचायतीच्या वतीने शिवाजी पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे मुकादम विक्रम पाटील, साहेबराव गणबासे, सुनील मोरे, फकिरा मोरे, दीपक पाटील, लक्ष्मण गणबासे, पंडित मोरे आदी हजर होते. तसेच याच रस्त्यावर वाडे येथील नेताजी सुभाष ग्राम वाचनालयाचे संचालक अशोक परदेशी यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी वाडे येथील वाचनालयाचे संचालक सुरेश पाटील, डिगंबर माळी, सामाजीक वनीकरण विभागाचे मुकादम विक्रम पाटील आदींसह वाडे येथील सामाजिक कार्यकर्ते भास्कर भिल्ल, सामाजिक वनीकरण विभाग भडगावचे सहाय्यक लागवड अधिकारी राजेंद्र बडगुजर, मुकादम विक्रम पाटील व नागरिक, मजूर उपस्थित होते.