धरणगाव : विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर नवनिर्मितीवर लक्ष केंद्रित करावे. तुमच्यातून देशाचे वैज्ञानिक निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री आमदार गुलाबराव पाटील यांनी सोनवद येथील मा.ना.काबरे विद्यालयात आयोजित विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले. अध्यक्षस्थानी पं.स. सभापती सुरेखा पाटील होत्या.तालुक्यातील सोनवद येथील मा.ना.काबरे विद्यालयात झालेल्या तालुकास्तरीय दोनदिवसीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिकचे ६० व माध्यमिक विभागाचे ३५ असे एकूण ९५ बालवैज्ञानिकांनी सहभाग नोंदविला. तर शिक्षकांचे प्राथमिक गटातून ७१ व माध्यमिक गटातून ४८ अशी ११९ उपकरणे प्रदर्शनात होती. व्यासपीठावर शासकीय समन्वय समितीचे अध्यक्ष गुलाबराव वाघ, जि.प.सदस्य गोपाल चौधरी, प्रेमराज पाटील, पं.स.सदस्य मुकुंद नन्नवरे, सचिन पवार, अनिल पाटील, सुरेखा कोळी, रेणू भिल, निर्दोष पवार, गटशिक्षणाधिकारी अनिल बाविस्कर, अशोक बिह्राडे, आ.एफ.सावकारे, मोहन पाटील आदी उपस्थित होते.