लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविडच्या दुसऱ्या लाटेत गर्भवती बाधित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सोनोग्राफी सेंटरवर बाधितांचे एक्सरे काढायला येणे हे देखील त्यामागचे एक कारण असू शकते, असा अंदाज काही डॉक्टरांकडून वर्तविण्यात येत आहे. तेव्हा प्रशासनाने या दृष्टीनेही नियोजन करावे, असाही एक सूर उमटत आहे.
दुसऱ्या लाटेत एक्सरे, सीटीस्कॅन करणाऱ्यांची संख्या अधिक वाढली आहे. याबाबत अनेक वेळा रुग्णांना कल्पना असल्याने कधीकधी डॉक्टरांच्या सांगण्याआधीच एक्सरे काढण्यास बाधित रुग्ण जात असतात. सोनोग्राफी सेंटरवर नियमित गर्भवती महिलांच्या तपासण्या होत असतात, अशा वेळी बाधित रुग्णांचा या केंद्रावरील वावर हा या गर्भवती महिलांसाठी धोकादायक ठरू शकतो, असाही निष्कर्ष डॉक्टरांकडून काढला जात आहे. त्यासाठी सोनेाग्राफी सेंटरने यासाठी गर्भवती महिलांच्या तपासणीचे दिवस ठरवून देणे गरजेचे आहे. यामुळे कोणाचीही गैरसोय होणार नाही.
प्रमाण वाढले
दुसऱ्या लाटेत महिनाभरातच ६० बाधित महिलांच्या प्रसूती कोविड रुग्णालयात झाल्या आहेत. आधी आठवड्याला दोन ते तीन प्रसूती होत होत्या आता दिवसाला तीन प्रसूती होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
एक्सरे, सीटीस्कॅनचे प्रमाण वाढले
कोरोना बाधितांचे एक्सरे व सीटीस्कॅन करण्याचे प्रमाण यंदा प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अशा सेंटरवर गर्दीही वाढली आहे. दिवसाला आधी दहा सीटीस्कॅन व्हायचे तेच प्रमाण आता ५० ते ६० वर गेले आहे; मात्र सगळ्याच रुग्णांना सर्रास एक्सरे व सीटीस्कॅन करण्याची गरज नसते, असाही एक मतप्रवाह आहे.
कोट
सेंटरवर सोनोग्राफीसाठी येणाऱ्या महिला व एक्सरेसाठी येणारे रुग्ण यांचे वेटींग तसेच एंट्री ही वेगवेगळ्या मार्गे असते. या ठिकाणाहून संसर्ग होण्याचे प्रमाण नाहीच्या बरोबर आहे. महिलांना वेटींगमध्ये बसूच दिले जात नाही. डॉ. किरण पाटील, सदस्य, रेडिओलॉजिस्ट संघटना.